वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय नौदलासोबत सागरी युद्धाभ्यासासाठी ब्रिटनमधून क्वीन एलिझाबेथ स्ट्राइक गूपची एंट्री झाली आहे. दोन्ही देशांचे नौदल वार्षिक कोकण युद्धाभ्यासात भाग घेणार आहे. क्वाड आणि भारत-प्रशांत महासागराच्या दृष्टीकोनातून दोन्ही देशांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. भारतासह महासागरात ब्रिटनचा हा समूह जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलासोबत सराव करणार आहे.भारतासोबतचा युद्धाभ्यास बंगालच्या उपसागरामध्ये होणार असल्याचे मानले जात आहे. त्यानंतर ब्रिटनच्या नौदलाचे पथक दक्षिण चीन समुद्राच्या दिशेने प्रवास करणार आहे.
22-23 जुलै रोजी होणाऱया या युद्धाभ्यासात 12 युद्धनौका, 30 हून अधिक लढाऊ विमाने, दोन पाणबुडय़ा आणि 4500 हून अधिक नौसैनिक भाग घेणार आहेत. एलिझाबेथ सीएजी पहिल्यांदाच एफ-35बी लढाऊ विमानांसह सागरी प्रवासावर निघाली आहे. या प्रयत्नांद्वारे ब्रिटनने भारत-प्रशांत महासागरात स्वतःच्या दोन गस्तनौकांना कायमस्वरुपी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्रातील मुक्तसंचार सुनिश्चित करण्याकरता ब्रिटनने हे पाऊल उचलले आहे.
हिंदी-प्रशांत महासागरात स्वतःचा प्रवास पूर्ण केल्यावर एलिझाबेथ सीएजी भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांसोबत अरबी समुद्रात युद्धाभ्यास करणार आहे. कारवार बंदरावर हा युद्धाभ्यास 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. तसेच सीएसजी एलिझाबेथ कारवार आणि मुंबईच्या बंदरांवर पोहोचणार आहे.
जपानसमोर देखील स्वतःच्या सैन्यक्षमता आणि क्वाड तसेच अन्य सहकाऱयांसोबत दृढ सैन्य सहकार्याची गरज निर्माण झाली आहे. चीनकडून निर्माण झालेल्या धोक्यामुळे जपान अत्यंत सतर्क झाला आहे. स्वतःच्या या सागरी दौऱयादरम्यान एलिझाबेथ सीएसजी जपानच्या मेरिटाइम फोर्सेससोबत सराव करणार आहे.