अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांचा भारत दौरा – एस. जयशंकर अन् अजित डोवाल यांच्याशी चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत करण्याचे सत्र सुरूच ठेवण्याचा अध्यक्ष जो बिडेन यांचा संकल्प आहे. आगामी काळात दोन्ही देश एकत्रितपणे काम करणार असल्याचे उद्गार ब्लिंकेन यांनी यावेळी काढले आहेत. अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर भारतासोबत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांनी यावेळी भारतातील कोरोना लसीकरणाकरता 2.5 कोटी डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.
अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्यावर देखील आम्ही तेथील लोकांच्या हितासाठी काम करत राहणार आहोत. अफगाणिस्तानच्या स्थितीबद्दल जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या भागात शांतता प्रस्थापित व्हावी अशी अमेरिकेची इच्छा आहे. भारत आणि अमेरिका दोघेही अफगाणिस्तानात मजबूत सरकार आणि शांततेचे समर्थक आहेत. क्षेत्रात विश्वासार्ह सहकारी असल्याने अफगाणिस्तानच्या विकासात भारताचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे आणि यापुढेही राहणार असल्याचे ब्लिंकेन म्हणाले. कोरोना, नव्या तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम यासारख्या आव्हानांना कुठलाच देश एकटय़ाने सामोरा जाऊ शकत नाही. देशांदरम्यान पूर्वीपेक्षा अधिक सहकार्याची गरज असल्याचे ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.
क्वाड मजबूत करावे लागणार
जागतिक मुद्दय़ांवर आमची चर्चा निश्चितपणे राष्ट्रीय अनुभव आणि ऐतिहासिक दृष्टीकोनांच्या आदान-प्रदानाने मजबूत होणार आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि समृद्धी दोन्ही देशांसाठी अफगाणिस्तानातील लोकशाहीच्या स्थैर्याइतकीच महत्त्वाची आहे. एक सहकारी व्यासपीठ म्हणून क्वाडला मजबूत करणे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. दहशतवादासारख्या आव्हानांवर मिळून काम करणे गरजेचे असल्याचे जयशंकर यांनी या चर्चेवेळी म्हटले आहे.
दोन दिवसांचा दौरा
अमेरिकेचे विदेशमंत्री ब्लिंकेन दोन दिवसांच्या दौऱयानिमित्त भारतात पोहोचले आहेत. बुधवारी संध्याकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. दिल्लीतील सिव्हिल सोसायटी लीडर्सच्या समुहाशी संवाद साधताना ब्लिंकेन यांनी भारत आणि अमेरिकन लोक मानवी प्रतिष्ठा, समान संधी, कायद्याचे राज्य, धर्म आणि श्रद्धेच्या स्वातंत्र्यात विश्वास ठेवणारे असल्याचे म्हटले आहे.
चीनला डिवचले
अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांच्या एका कृत्यामुळे चीनचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे. ब्लिंकेन यांनी बुधवारी तिबेटचे धर्मगुरु दलाई लामांच्या एका शिष्टमंडळाची भेट घेतली आहे. तिबेट ही चीनची दुखरी नस आहे. दलाई लामांशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास चीनचा विरोध आहे.
डोवाल यांची घेतली भेट
ब्लिंकेन यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेतली आहे. त्यांनी सुरक्षा, आर्थिक आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमधील महत्त्वाच्या सामरिक मुद्दय़ांवर चर्चा केली आहे. द्विपक्षीय संबंधांना पुढील स्तरापर्यंत नेण्यासाठी दीर्घकालीन उपायांवर दोघांनी भर दिला आहे. दोघांच्या एक तासाच्या बैठकीत क्षेत्रीय तसेच जागतिक सुरक्षेशी संबंधित समकालीन तसेच भविष्यातील मुद्दय़ांवर चर्चा झाली आहे.