अलास्काच्या दुर्गम प्रदेशात दोन्ही देशांच्या सैनिकांचा कसून सराव
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या अतिदुर्गम, बर्फाळ आणि अतिशीत अलास्का प्रांतात सध्या भारत आणि अमेरिकेचे सैनिक कसून युद्ध सराव करीत असून या सरावाचा प्रारंभ ‘कबड्डी’ या अस्सल भारतीय खेळाने करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत लोकप्रिय असणाऱया स्नोबॉल फाईट या खेळातही सैनिकांनी भाग घेतला.
दोन्ही देशांचे प्रत्येकी 350 सैनिक या सरावात भाग घेत आहेत. हा सराव सर्वात प्रदीर्घ काळ चालणार आहे. अतिकठीण शीत हवामानाची भारतीय सैनिकांना सवय व्हावी यासाठी अलास्का हा प्रांत सरावासाठी निवडण्यात आला आहे. गेल्यावर्षी भारतात राजस्थानातील शुष्क वाळवंटाचा प्रदेश सरावासाठी निवडण्यात आला होता. हा सराव ‘युद्ध अभ्यास’ या नावाने ओळखला जातो.
हा सराव म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या सामरिक संबंधांचे उदाहरण आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांचा आणि सैन्य संस्कृतांचा एकमेकांशी परिचय वाढावा, एकमेकांची कार्यपद्धती समजावी, तसेच एकमेकांच्या क्षमतांची कल्पना यावी आणि परस्पर सहकार्याचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण विषयक सहकार्य मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. 2016 मध्ये अमेरिकेने भारताला ‘मुख्य संरक्षण भागिदार’ म्हणून ओळखले आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वाचे संरक्षण आणि तंत्रज्ञानविषयक करार झाले आहेत.