ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
चीनच्या कुरघोड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेकडून 30 ‘MQ-9B’ गार्डियन ड्रोन खरेदी करणार आहे. लवकरच या ड्रोनशी संबंधित खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेत सादर करण्यात येणार आहे.
पूर्व लडाखमधील तणावग्रस्त परिस्थितीत भारताने जास्तीत जास्त संरक्षण सामग्री खरेदीवर भर दिला आहे. 30 जनरल अॅटॉमिक्स MQ-9B रेपर ड्रोन खरेदी करार दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा रेपर मध्यम उंचीचे ड्रोन खरेदी करण्यात येतील. त्यानंतर पुढील तीन वर्षात उर्वरित 24 ड्रोन खरेदी करण्यात येतील. हा करार अंदाजे 22000 कोटी रुपयांचा असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.
MQ-9 रेपर ड्रोन अत्यंत मॉड्यूलर आहेत. या ड्रोनचा कमाल ताशी वेग 444.5 किमी असून, तो 50 हजार फूट उंच उडू शकतो. तसेच हा ड्रोन हवेत 27 तासांहून अधिक काळ उड्डाण करू शकतो, असा दावा ड्रोन बनवणारी कंपनी जनरल अॅटॉमिक्सने केला आहे. हा ड्रोन एकाच वेळी 12 हालचालींवर लक्ष ठेऊ शकतो. तर, एक क्षेपणास्त्र सोडल्यानंतर फक्त 0.32 सेकंदात आणखी एक क्षेपणास्त्र सोडू शकतो. हा ड्रोन 1746 किलो वजन पेलू शकतो. एजीएम -114 हेलफायर क्षेपणास्त्र आणि लेसर मार्गदर्शित बॉम्ब ठेवण्यास हे ड्रोन सक्षम आहेत.