ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघासमोर पराभव वाचवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. न्यूझीलंड अ संघाने पहिल्या डावात 562 धावांचा डोंगर रचल्यानंतर भारत अ संघ अद्याप 219 धावांनी पिछाडीवर आहे.
हॅग्ले ओव्हलवरील या लढतीत भारत अ संघाचा डाव 216 धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंड अ संघाने 7 बाद 562 धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर भारतीय अ संघाने दुसऱया डावात 2 बाद 127 धावांपर्यंत मजल मारली. अंधुक प्रकाशामुळे दिवसाच्या खेळाची चार षटके बाकी असताना समाप्ती करण्यात आली. प्रियंक पांचाळ 67 तर शुभमन गिल 33 धावांवर नाबाद राहिले.
शनिवारी दिवसाच्या प्रारंभी 5 बाद 385 या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर डेन क्लीव्हर व मार्क चॅपमन यांनी सहाव्या गडय़ासाठी चक्क 268 धावांची भागीदारी साकारत संघाला भरभक्कम स्थिती प्राप्त करुन दिली. 111 धावांवर नाबाद राहिलेल्या क्लेव्हरने नंतर 344 चेंडूत 196 धावांपर्यंत झेप घेतली. शतकासाठी 15 धावांची आवश्यकता असणाऱया चॅपमनने 245 चेंडूत 114 धावांपर्यंतची मजल गाठली.
यष्टीरक्षक-फलंदाज क्लीव्हरने 482 मिनिटांच्या खेळीत 20 चौकार व 1 षटकार खेचले तर चॅपमनने 377 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत 11 वेळा चेंडू सीमापार धाडले. पुढे, आठव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या कोल मॅकोन्शीने 74 चेंडूत नाबाद 50 धावा फटकावल्या. शिवाय, क्लीव्हरसमवेत सातव्या गडय़ासाठी 114 धावांची भागीदारी साकारली.
भारत अ संघाच्या गोलंदाजांना अर्थातच, या लढतीत बरेच झगडावे लागले. केवळ इशान पोरेल व एस. संदीप वॉरियर यांना प्रत्येकी दोन बळी घेता आले. सामन्यात दुसऱयांदा फलंदाजीला उतरल्यानंतर भारत अ संघाचा चतुरस्त्र सलामीवीर मयांक अगरवाल पहिल्याच षटकात बाद झाला. अभिमन्यू ईश्वरन 26 धावांवर बाद झाल्यानंतर भारत अ संघाची 2 बाद 59 अशी स्थिती झाली होती.
संक्षिप्त धावफलक
भारत अ : 216 व 37 षटकात 2-127 (प्रियंक पांचाळ नाबाद 67, शुभमन गिल नाबाद 33). न्यूझीलंड अ : 160.3 षटकात 7 बाद 562. (डेन क्लीव्हर 196, मार्क चॅपमन 114, एस. संदीप वॉरियर 2-91, इशान पोरेल 2-90).