भारत आणि चीन : दोन झोपाळू देश
सध्या चीन आणि भारत यांच्यात लडाखवरून तणाव टोकाला गेला आहे. तसे पाहू गेल्यास या दोन देशांमध्ये कोणत्याही संबंधात एकमत जवळजवळ नाहीच. मात्र, ‘झोप’ या विषयात दोन्ही देशांचे ‘गूळपीठ’ एकदम झकास जमताना दिसते. या दोन्ही देशांमधील नागरीक प्रत्येकी सरासरी 9 आणि 8.75 झोप काढतात. (कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासात लागते ती डुलकी येथे जमेस धरलेली नाही). या दोन्ही देशांमध्ये भात खाण्याचे प्रमाण जास्त असल्याने असे होते.
ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (आर्थिक सहकार्य व विकास संघटना) या विश्वविख्यात संस्थेने विविध देशांमधील नागरीकांचे दिनक्रम कसे असतात याचे सर्वेक्षण नुकतेच केले. त्यात या संस्थेला अविश्वसनीय प्रकार अनुभवावयास मिळाले. या देशांमधील लोक किती झोपतात, किती वेळ टीव्ही किंवा मोबाईल पाहतात, किती वेळ वाचतात, किती वेळ मनोरंजनात घालवितात, अशा अनेक बाबींचे सर्वेक्षण करून या संस्थेने त्याची माहिती प्रसिद्ध केली.
काय आवडते…काय नाही
सवेक्षण असे सांगते की बहुतेक देशांमधील लोकांना बाहेर खाणे, रिकामटेकडे अंथरूणात पडून राहणे, आवडीचा मैदानी खेळ पाहणे (खेळणे नव्हे), संगणकीय खेळ (मात्र) खेळणे किंवा घरीच चित्रपट पाहणे ही कामे सर्वाधिक आवडतात आणि त्यांसाठी ते बराच वेळही देतात. मात्र, गृहपाठ करणे, नोकरीच्या शोधात भटकणे ही कामे त्यांना फारशी आवडत नाहीत.
सर्वाधिक रिकामा वेळ
या संदर्भात ब्रिटनमधील लोक अधिक भाग्यशाली दिसतात. कारण त्यांना जगात सर्वात जास्त रिकामा वेळ ‘भेटतो’ (म्हणजे सापडतो). ज्या देशांमध्ये लोकांना विशेष रिकामा वेळ मिळत नाही आणि चरितार्थ चालविण्यासाठी भरपूर राबावे लागते अशा देशांमधील लोक या राबणुकीला कंटाळलेले दिसतात. ते सारख्या तक्रारी किंवा चिडखोरपणा करीत राहताना दिसून येतात.
24 तासांपैकी 90 टक्के वेळ…
जगभरात बव्हंशी लोक दिवसाच्या 24 तासांपैकी 90 टक्के वेळ झोपणे, खाणे, विश्रांती घेणे, मनोरंजन आणि गप्पा मारणे यात घालवतात असा आश्चर्यकारक निष्कर्ष या संस्थेने काढला आहे. मग लोक काम केव्हा करतात हा प्रश्न पडणे शक्य आहे. तथापि, काम करतानाही लोक गप्पा मारतात. तसेच सुटी व रजेच्या काळात लोक काय करतात याचाही समावेश यात झालेला आहे.