वृत्तसंस्था/ टोकियो
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या हॉकी या क्रीडाप्रकारात बुधवारी येथे विद्यमान विजेता इंग्लंड आणि भारत यांच्यात प्राथमिक गटातील सामना होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात अग्रमानांकित हॉलंडकडून एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता.
भारतीय महिला हॉकी संघाकडून बुधवारच्या सामन्यात भारताला विजयासाठी संघर्ष करावा लागू शकतो. कारण इंग्लंडचा महिला संघ भारताच्या तुलनेत अधिक बलवान असून या संघाने 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. अ गटातील बुधवारी होणाऱया या सामन्यात रानी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करावी लागेल तरच विजयाची अपेक्षा बाळगता येईल. भारतीय संघातील खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठविताना अवघड जात असल्याचे दिसून येते. भारतीय संघाला सलग दुसऱया सामन्यात पराभव पत्करावा लागला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अ गटामध्ये एकूण सहा संघांचा समावेश असून गुणतक्त्यात हॉलंड पहिल्या स्थानावर असून जर्मनी दुसऱया तर ब्रिटन तिसऱया, आयर्लंड चौथ्या, दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि भारत सहाव्या आणि शेवटच्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन संघांना अद्याप आपले विजयाचे खाते उघडता आलेले नाही. आयर्लंडने एक विजय मिळविला आहे. सरस गोल सरासरीवर दक्षिण आफ्रिकेने भारताला मागे टाकले आहे. या स्पर्धेत भारताचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. अ आणि ब गटातील पहिले चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.
विद्यमान विजेत्या इंग्लंडला जर्मनीकडून 1-2 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला पण दुसऱया सामन्यात ब्रिटनने दक्षिण आफ्रिकेचा 4-1 असा पराभव केला आहे. पहिल्या सामन्यातील झालेल्या चुका सुधारून भारतीय संघ आक्रमक खेळावर भर देईल, अशी अपेक्षा आहे.