अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचा खराब फॉर्म भारतासाठी चिंतेचा, सलामीला किशन की राहुल? अद्याप पेच कायम
दुबई / वृत्तसंस्था
आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय संघ आज (सोमवार दि. 18) इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी कर्णधार विराट कोहलीसमोर अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचा खराब फॉर्म व फलंदाजी क्रमातील काही पेच, अशा दुहेरी समस्यांवर मार्ग काढण्याचे आव्हान असणार आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडू आयपीएलमधून थेट विश्वचषकासाठी आले आहेत. त्यामुळे मॅच प्रॅक्टिसची फारशी चिंता नाही. मात्र, परफेक्ट कॉम्बिनेशन हा प्राधान्यक्रम आवश्यक असणार आहे.
रविवार दि. 24 रोजी प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धेत भारताची सलामी लढत कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार असून त्यापूर्वी सलामीला रोहित शर्माचा सहकारी कोण असेल आणि पंडय़ाला वेळेत सूर सापडला नाही तर त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा, हे निश्चित होणे क्रमप्राप्त असणार आहे.
आज इंग्लंडविरुद्ध आणि गुरुवार दि. (21) रोजी होणाऱया ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात भारतीय संघ अंतिम एकादशमधील स्थान निश्चित नसलेल्या खेळाडूंना प्राधान्याने संधी देईल, असे स्पष्ट संकेत आहेत. या सराव सामन्यांच्या माध्यमातून त्यांचा फलंदाजी, गोलंदाजीतील फॉर्म आजमावून पाहणे, हा संघव्यवस्थापनाचा मुख्य उद्देश असणार आहे.
उपकर्णधार रोहित शर्मा सलामीला उतरणार, हे निश्चित आहे. मात्र, त्याचा सहकारी सलामीवीर इशान किशन असेल की केएल राहुल, हे अद्याप ठरलेले नाही. सरावाचे दोन सामने असल्याने या दोन्ही वेळा इशान किशन व केएल राहुल या उभयतांनाही आजमावून पाहण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
केएल राहुलला दडपणाखाली खेळण्याचा बराच अनुभव असल्याने, शिवाय, सध्या उत्तम बहरात असल्याने त्याला प्राधान्य मिळू शकते, हे देखील विसरुन चालणार नाही. अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेतील 14 सामन्यात त्याने 138.80 च्या स्ट्राईक रेटने 626 धावांची आतषबाजी केली. यात 30 उत्तुंग षटकारांचा प्रामुख्याने समावेश राहिला आहे. पंजाब किंग्सची चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध लढत औपचारिक होती. मात्र, त्यातही केएल राहुलने 42 चेंडूत 98 धावांची केलेली फटकेबाजी लक्षवेधी ठरली आहे.
दुसरीकडे, इशान किशनने मुंबई इंडियन्सतर्फे रोहित शर्मासोबतच सलामीला उतरताना मागील सलग दोन सामन्यात आक्रमक फटकेबाजी करत आपल्या फॉर्मची जोरदार वर्दी दिली. आयपीएल मोहिमेत त्याने दोन तडफदार अर्धशतके झळकावली.
जलद गोलंदाजीच्या आघाडीवर, भुवनेश्वर कुमार व जसप्रित बुमराहची निवड गृहित धरली जाते आहे. मात्र, 1 फिरकीपटू कमी खेळवल्यास तर शार्दुल ठाकुरची निवड करत जलद गोलंदाजी आणखी भक्कम करण्याचा पर्याय भारताकडे असणार आहे. इंग्लंडसाठी नव्याने संघात दाखल होत असलेल्या जोस बटलरकडून बऱयाच अपेक्षा असतील. जेसॉन रॉय व जॉनी बेअरस्टो या दिग्गज खेळाडूंवर देखील हा संघ अवलंबून असेल.
आयपीएलमधील अनुभव पाहता, लियाम लिव्हिंगस्टोन व डेव्हिड मलान चेंडू उशिराने बॅटवर येत असल्याने आणखी झगडणार का, हे पहावे लागणार आहे. इयॉन मॉर्गनने कर्णधार या नात्याने केकेआरसाठी लक्षवेधी योगदान दिले. पण, तो स्वतः फारशा धावा जमवू शकला नाही. ती कसर त्याने येथे महत्त्वाच्या क्षणी भरुन काढली तर ही बाब इंग्लंडच्या पथ्यावर पडू शकेल.
संभाव्य संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर, शार्दुल ठाकुर, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंडय़ा.
इंग्लंड ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसॉन रॉय, सॅम बिलिंग्ज, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, टॉम करण, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मिल्स, अदिल रशिद, मार्क वूड.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
तिसरा फिरकीपटू कोण? लेगब्रेक राहुल चहर की ऑफब्रेक रविचंद्रन अश्विन?
युएईमधील खेळपट्टय़ांचे संथ स्वरुप पाहता, फिरकीच्या आघाडीवर रविंद्र जडेजा व वरुण चक्रवर्ती यांचे स्थान जवळपास निश्चित मानले जाते. या दोघांची निवड गृहित धरली तर तिसरा फिरकीपटू या नात्याने लेगब्रेक राहुल चहर व ऑफब्रेक रविचंद्रन अश्विन यांच्यात कोणाची निवड होणार, हे औत्सुक्याचे असेल. यापूर्वी, आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी कर्णधारांच्या परिसंवादात विराटने राहुल चहरच्या प्रगल्भतेचे कौतुक केले होते. राहुल चहर येथील खेळपट्टय़ांवर अधिक परिणामकारक ठरण्याची शक्यता असल्यानेच अनुभवी यजुवेंद्र चहलला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेल्याचे विराटने त्यावेळी स्पष्ट केले होते.