भारत-ब्रिटन सामना बरोबरीत, ऑस्ट्रेलियाची द.आफ्रिकेवर मात-
वृत्तसंस्था/ जोहोर (मलेशिया)
येथे सुरू असलेल्या सुलतान जोहोर चषक कनिष्ठ पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत राऊंड रॉबीन लिग गटातील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने ब्रिटनला 5-5 असे गोलबरोबरीत रोखले. नंतर झालेल्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने भारताचे अंतिम फेरीतील स्थानही निश्चित झाले. आता भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदाची लढत होईल.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील या शेवटच्या राऊंड रॉबीन सामन्यात भारतातर्फे पुवन्ना सीबी, अमनदीप, अरायजितसिंग हुंडाल, शारदानंद तिवारी यांनी गोल केले. तर ब्रिटनतर्फे मॅक्स अँडरसन, हॅरीसन स्टोन आणि जेमी गोल्डन यांनी गोल नोंदविले. भारतातर्फे शारदानंद तिवारीने तसेच ब्रिटनतर्फे मॅक्स अँडरसन आणि जेमी गोल्डन यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने राऊंड रॉबिन लिग फेरीअखेर गुणतक्त्यात पाच सामन्यातून 8 गुणासह दुसरे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया संघाने याआधीच अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले असून त्यांनी 5 सामन्यातून 13 गुण घेत गुणतक्त्यात पहिले स्थान मिळवले आहे. दरम्यान या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या ब्रिटनचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे. त्यांनी पाच सामन्यातून सात गुण मिळविले.
उशिरा झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 6-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडविला. द.आफ्रिकेने हा सामना जिंकला असता तर त्यांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली असती. द.आफ्रिकेच्या पराभवामुळे भारताला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली. जपान व ब्रिटन यांनी प्रत्येकी 7 तर दक्षिण आफ्रिकेचे 6 गुण झाले. यजमान मलेशियाला एका गुणासह तळाचे स्थान मिळाले.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील सामन्यात पहिल्याच मिनिटाला मॅक्स अँडरसनने ब्रिटनचे खाते उघडले. त्यानंतर सातव्या मिनिटाला पुवन्नाने शानदर गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. दोन्ही संघांनी पूर्वार्धात जलद आणि आक्रमक खेळावर अधिक भर दिला होता. सामन्याच्या पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्याच्या दुसऱया 15 मिनिटांच्या कालावधीत उभय संघांना गोल नोंदविता आला नाही. मध्यंतरावेळी दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिले होते.
सामन्याच्या उत्तरार्धात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याचा लाभ उठवता आला नाही. 40 व्या मिनिटाला मॅक्स अँडरसनने ब्रिटनचा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. 42 व्या मिनिटाला हॅरीसन स्टोनने गोल नोंदवून ब्रिटनला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. 50 व्या मिनिटाला अमनदीपने तसेच 53 व्या मिनिटाला अरायजितसिंग हुंडालने प्रत्येकी एक गोल नोंदवून भारताला 3-3 अशी बरोबरी साधून दिली. 54 व्या मिनिटाला गोल्डनने ब्रिटनचा चौथा गोल केला. शारदानंद तिवारीने 56 व्या मिनिटाला भारताला पुन्हा बरोबरी साधून दिली. काही सेकंदातच गोल्डनने संघाचा पाचवा तर वैयक्तिक दुसरा गोल करून ब्रिटनला पुन्हा एका गोलाची आघाडी मिळवून दिली होती.
सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना शारदानंद तिवारीने भारताचा पाचवा गोल नोंदवून हा सामना 5-5 असा बरोबरीत सोडविला. या सामन्यात खेळाच्या उत्तरार्धात भारताकडून चार गोल तसेच ब्रिटनकडूनही चार गोल असे एकूण 8 गोल नोंदविले गेले. हा सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.