वृत्तसंस्था / मेलबर्न
पुढील महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार असून 69 दिवसांच्या या दौऱयाचे निश्चित झालेले वेळापत्रक बुधवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. या दौऱयात वनडे, टी-20 व कसोटी मालिका होणार असून गुलाबी चेंडूने खेळविली जाणारी पहिली दिवस-रात्र कसोटी ऍडलेडमध्ये होणार आहे.
या दौरा कार्यक्रमात 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीचाही समावेश असून सिडनीमध्ये 12 नोव्हेंबरपासून क्वारंटाईन कम सराव सत्र सुरू होणार आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका डे-नाईट सामन्याने ऍडलेड ओव्हलवर 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मेलबर्न (26 डिसेंबर), सिडनी (7 जानेवारी), ब्रिस्बेन (15 जानेवारी) येथे त्यानंतरच्या कसोटी होणार आहेत.
बीसीसीआयने मागणी केल्याप्रमाणे बॉक्सिंग डे कसोटी व सिडनीमधील नववर्षातील कसोटी यांच्यात आठवडय़ाचे अंतर ठेवण्यात आले आहे.
‘भारतीय संघ 12 नोव्हेंबर रोजी सिडनीत संबंधितांची परवानगी मिळाल्यानंतर दाखल होईल. 27 नोव्हेंबर रोजी पहिला सामना होण्याआधी हा संघ क्वारंटाईनमध्ये सिडनीतच राहील.
क्वारंटाईनमध्ये असताना ते सरावही करू शकणार आहेत,’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘सीएने कसोटीआधीच्या वेळापत्रकालाही मान्यता दिली आहे. त्यानुसार भारत अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध ड्रमॉईन ओव्हल (6-8 डिसेंबर, न्यू साऊथ वेल्स) येथे सराव सामना खेळेल. त्यानंतर भारत व ऑस्ट्रेलिया अ यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर डे-नाईट सराव सामना 11-13 डिसेंबर या कालावधीत खेळविला जाईल,’ असेही यात नमूद आहे.
या दौऱयाची सुरुवात वनडे मालिकेने होणार असून हे सामने सिडनी (27 व 29 नोव्हेंबर), कॅनबेरा (2 डिसेंबर) येथे होतील. त्यानंतर तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील लढती कॅनबेरा (4 डिसेंबर) व सिडनी (6 व 8 डिसेंबर) येथे खेळविल्या जातील. या दोन्ही मालिका सिडनी व कॅनबेरा या दोनच ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. ऍडलेडमध्ये पहिली कसोटी 17 डिसेंबरपासून सुरू होत असून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी ही पहिलीच डे-नाईट कसोटी असेल.
विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही डे-नाईट कसोटी गमविलेली नाही. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड, द.आफ्रिका, इंग्लंड व पाकिस्तान यांच्याविरुद्ध ऍडलेडमध्ये झालेल्या चार डे-नाईट कसोटी जिंकल्या आहेत तर भारताने बांगलादेशविरुद्ध मागील वर्षी झालेली एकमेव डे-नाईट कसोटी जिंकली आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत मालिका निश्चित करण्यासाठी बीसीसीआयने जी विधायक भूमिका बजावली, त्याबद्दल सीएचे हंगामी सीईओ निक हॉकली यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मेलबर्नमध्ये होणाऱया बॉक्सिंग डे कसोटीसाठी प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णयही व्हिक्टोरिया राज्याच्या सहमतीने घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.