जेमिमा रॉड्रिग्ज बहरात आल्याने भारतीय संघाला दिलासा
गोल्ड कोस्ट / वृत्तसंस्था
जेमिमा रॉड्रिग्ज उत्तम बहरात आल्यानंतर भारतीय महिला संघ आज (शनिवार दि. 9) ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध होणाऱया दुसऱया टी-20 सामन्यात आणखी ताकदीने आक्रमणावर भर देण्यासाठी प्रयत्नशील असेल. यापूर्वी पहिला टी-20 सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला होता. उभय संघांतील आजची लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी खेळवली जाणार आहे.
वारंवार अपयशी ठरत आलेल्या आणि वनडे संघातील स्थान यापूर्वीच गमावलेल्या जेमिमावर सातत्याने टीका होत होती. मात्र, पहिल्या टी-20 सामन्यात तिने अवघ्या 36 चेंडूत 49 धावांची आतषबाजी करत सनसनाटी पुनरागमन नोंदवले.
21 वर्षीय जेमिमाने यापूर्वी द हंड्रेड या स्पर्धेत देखील प्रभावी खेळ साकारला होता आणि तीच घोडदौड तिने येथे पहिल्या लढतीत देखील कायम राखली. स्मृती मानधना व शफाली वर्मा यांचा बहारदार फॉर्मही लक्षवेधी ठरला. मानधना व शफाली यांनी यापूर्वी अनिर्णीत कसोटीत देखील मोलाचे योगदान दिले होते. दुखापतीमुळे वनडे मालिका व कसोटीत खेळू न शकलेल्या हरमनप्रीत कौरने पहिल्या सामन्यात अल्पशा खेळीतही चमक दाखविली.
यापूर्वी, गुरुवारी पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 15.2 षटकात 4 बाद 131 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. मात्र, त्याचवेळी पावसाचा व्यत्यय आला आणि पुढे तो सामनाच रद्द करावा लागला. पुढील वर्षी होणाऱया वनडे विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विशेषतः हरमनप्रीतसारख्या भारतीय खेळाडूंना सरावासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. यास्तिका भाटिया व रिचा घोष मध्यफळीत लक्षवेधी योगदान देण्यासाठी महत्त्वाकांक्षी असतील.
गोलंदाजीच्या आघाडीवर, शिखा पांडेवर मुख्य भिस्त असेल. याशिवाय, रेणुका सिंग, मेघना सिंग, फिरकीपटू पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा यांच्याकडून बऱयाच अपेक्षा असतील.
संभाव्य संघ
भारत ः हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, शिखा पांडे, मेघना सिंग, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका सिंग.
ऑस्ट्रेलिया ः मेग लॅनिंग (कर्णधार), डॅर्सी ब्राऊन, मैतलन ब्राऊन, स्टेल्ला कॅम्पबेल, निकोला कॅरे, हन्नाह डार्लिंग्टन, ऍश्ले गार्डनर, ऍलिसा हिली, ताहिला मॅकग्रा, सोफी मॉलिन, बेथ मुनी, एलिस पेरी, जॉर्जिया रेडमेन, मॉली स्ट्रनो, ऍनाबेल सुदरलँड, व्लॅम्निक, जॉर्जिया वेरहॅम.
सामन्याची वेळ ः दु. 1.40 वा.
ऑस्ट्रेलियन संघात अनेक अव्वल अष्टपैलू समाविष्ट
यजमान ऑस्ट्रेलियन महिला संघात अनेक अव्वल दर्जाचे अष्टपैलू खेळाडू समाविष्ट असून हीच त्यांची जमेची बाजू आहे. कर्णधार मेग लॅनिंगकडे यामुळे अनेक पर्याय उपलब्ध असतील आणि संघातील युवा खेळाडू पुढील 2 लढतीत आश्वासक खेळ साकारतील, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.
गुलाबी चेंडूवरील कसोटीत लक्षवेधी प्रदर्शन साकारणाऱया तहिला मॅकग्राने पहिल्या टी-20 सामन्यात एकच षटक टाकले असले तरी त्यात 14 धावा दिल्या. आता उर्वरित सामन्यात स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती प्रयत्नशील असेल. युवा हन्नाह डार्लिंग्टन देखील संधीचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे. एलिस पेरी, एलिसा हिली, मेग लॅनिंग, ऍश्ले गार्डनर व बेथ मुनी हे भारतीय संघाला आव्हान देण्याची पुरेपूर क्षमता राखून आहेत.