मेलबर्न :
भारत-ऑस्ट्रेलिया हे जागतिक स्तरावरील दोन दिग्गज संघ आमनेसामने भिडतील, त्यावेळी प्रामुख्याने दोन्ही संघातील गोलंदाजच त्यात निर्णायक भूमिका बजावतील, असे ऑस्ट्रेलियन सलामीवीर जो बर्न्स गुरुवारी म्हणाला. विराट कोहली आणि कंपनी ऑस्ट्रेलियन भूमीत डिसेंबर-जानेवारीत 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणे अपेक्षित असून अर्थातच, तूर्तास तरी या मालिकेवर अनिश्चिततेचे सावट आहे.
‘ऑस्ट्रेलिया व भारतीय संघाची गोलंदाजी लाईनअप सर्वाधिक भक्कम आहे. त्यामुळे, दोन्ही संघातील फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांना कसे सामोरे जातात, यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील’, असे बर्न्सने व्हीडिओ कॉन्फरन्सवरुन बोलताना नमूद केले. या मालिकेत भारताच्या गोलंदाजीची मुख्य धुरा जसप्रित बुमराह व मोहम्मद शमी तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची मुख्य धुरा पॅट कमिन्सकडे असेल, असे संकेत आहेत. यापैकी कमिन्स आयसीसी मानांकन यादीत अव्वलस्थानी विराजमान आहे.
बर्न्सने यादरम्यान दोन्ही संघांच्या आघाडी फळीतील फलंदाजांचा विशेष उल्लेख केला. विराट कोहली व रोहित शर्मा ही भारतीय जोडगोळी जगातील कोणत्याही गोलंदाजाचा समाचार घेऊ शकतात तर स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्वीइतकाच मजबूत झाला आहे. या मालिकेच्या निमित्ताने अव्वलमानांकन देखील पणाला लागणार असल्याने त्यामुळे देखील येथे रंगणाऱया जुगलबंदीला विशेष महत्त्व आहे. सध्या आयसीसी कसोटी मानांकन यादीत ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी आहे. मात्र, कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आतापर्यंत भारताने आघाडी घेतली आहे.
सलामीवीर या नात्याने ऑस्ट्रेलियाची भिस्त जो बर्न्सवर असणार आहे. या पार्श्वभूमीवर त्याने नव्या चेंडूवरील मारा निष्प्रभ करण्यावर आपला मुख्य भर असेल, असे नमूद केले.
‘भारताचा संघ जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाचा आहे. जागतिक मानांकनात ते अव्वलस्थानी होते. त्यांची जागा आता आमच्या संघाने घेतली आहे. त्यामुळे देखील ही मालिका रंगतदार ठरेल आणि यात निर्णायक योगदान देणे ही माझ्यासह प्रत्येक खेळाडूची महत्त्वाकांक्षा असेल’, असे बर्न्स पुढे म्हणाला.
टी-20 विश्वचषकाबाबतही अनिश्चितता कोरोना व्हायरसमुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेवर देखील अनिश्चिततेचे सावट असून त्यातच क्रिकेट ऑस्ट्रेलिया आर्थिक अरिष्टात आहे. सध्या त्यांनी खर्च कपातीचे धोरण काटेकोररित्या अंमलात आणले असून 2020-21 हंगामातील शेफिल्ड शील्ड चषक स्पर्धेतील सामने कमी करण्याचा प्रस्तावही त्यांच्या विचाराधीन आहे. बर्न्सला मात्र यामुळे फारसा फरक पडणार नाही, असे वाटते