वनडे मालिकेतील जेतेपदाचा फैसला होणार
बेंगळूर / वृत्तसंस्था
मालिकेत दमदार सलामी देणारा ऑस्ट्रेलियन संघ व त्यानंतर जोरदार मुसंडी मारणाऱया यजमान भारतीय संघात आज (रविवार दि. 19) वनडे क्रिकेट मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना होणार असून या निर्णायक लढतीत दोन्ही संघात प्रचंड रस्सीखेच अपेक्षित आहे. उभय संघात सध्या 1-1 अशी बरोबरी असून यामुळे या लढतीला निर्णायक स्वरुप प्राप्त झाले आहे. दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
मालिकेत मुंबईत संपन्न झालेल्या पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा अक्षरशः धुव्वा उडवला. पण, राजकोटमध्ये भारताने अतिशय आक्रमक खेळ साकारताना ऑस्ट्रेलियाला तिन्ही आघाडय़ांवर धूळ चारली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताने राजकोटमधील दुसऱया वनडे सामन्यात फलंदाजी क्रमात आणखी प्रयोग करणे शिताफीने टाळले. शिवाय, पाचव्या स्थानी फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर केएल राहुलने तेथेही दर्जेदार खेळी साकारली.
रोहित शर्मा व शिखर या जोडीने सलामीवीरांची भूमिका पार पाडल्यानंतर विराट नेहमीप्रमाणे तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरला आणि श्रेयस अय्यर पूर्ववत चौथ्या स्थानी फलंदाजीला आला. आजच्या लढतीत हाच क्रम कायम राखला जाणे अपेक्षित आहे. या मालिकेत अद्याप बडय़ा खेळीच्या प्रतिक्षेत असणाऱया रोहित शर्माला राजकोटमध्ये क्षेत्ररक्षण करताना डाव्या खांद्याला वेदना जाणवल्या. पण, या निर्णायक लढतीसाठी तो पूर्ण तंदुरुस्तीसह उपलब्ध असेल, असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे.
मागील सामन्यात मनीष पांडेला दुखापतग्रस्त ऋषभ पंतच्या जागेवर संधी देण्यात आली. आता पंत तंदुरुस्त झाला आहे का, हे आज स्पष्ट होईल. भारताला मध्यफळीत विस्फोटक फलंदाजाची प्रकर्षाने आवश्यकता आहे आणि ती कसर केएल राहुल भरुन काढू शकेल, अशी नवी अपेक्षा या निमित्ताने निर्माण झाली आहे. पंतच्या गैरहजेरीत केएल राहुलने यष्टीरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली असून यात त्याने ऍरॉन फिंचला यष्टीचीत केले. शिवाय, दोन झेलही घेतले होते.
ऑस्ट्रेलियन संघात बदल नाही
या निर्णायक लढतीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ फारसे व्यापक फेरबदल करण्याची शक्यता अगदीच कमी आहे. कुलदीप यादवने स्टीव्ह स्मिथला बाद करेतोवर राजकोटमधील लढतीत ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व होते. पण, त्यानंतर निर्णायक टप्प्यात त्यांची निराशा झाली. बहरातील मार्नस लाबुशाने दोनवेळा प्रभावी ठरला. पण, मोक्याच्या क्षणी बाद व्हावे लागल्याने त्याची निराशा झाली. मागील लढतीत 10 षटकात 78 धावांची लयलूट करु दिल्यानंतर मिशेल स्टार्क येथे काटेकोर मारा करण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्या तुलनेत पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर फारशा धावा जमवता आल्या नाहीत. ऍडम झाम्पाला वनडे क्रिकेटमध्ये कोहलीची पाचव्यांदा प्राईज विकेट मिळाली होती. ऍस्टॉन ऍगर मात्र फारसा प्रभावी ठरला नव्हता.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया : ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), पॅट्रिक कमिन्स, सीन ऍबॉट, ऍस्टॉन ऍगर, पीटर हँडस्कॉम्ब, जोश हॅझलवूड, मार्नस लाबुशाने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ऍस्टॉन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा.
सामन्याची वेळ : दु. 1.30 पासून.
बॉक्स
रोहित शर्मा, शिखर धवनच्या उपलब्धतेबाबत निर्णय आज
रोहित शर्मा व शिखर धवन हे दोन्ही सलामीवीर किरकोळ दुखापतीमुळे त्रस्त असल्याने सलामीला कोण, हा पेच पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या खेळाडूंच्या उपलब्धतेविषयी आजच निर्णय होईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. रोहितला क्षेत्ररक्षण करताना खांद्याला वेदना जाणवल्या तर पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू धवनला इजा करुन गेला होता.
कोटस
राजकोटमध्ये 30 ते 40 षटकांच्या कालावधीत आम्ही 3 फलंदाज गमावले आणि त्याची पराभवाच्या रुपाने किंमत मोजावी लागली. बेंगळुरातील खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्याने येथेही धावांची आतषबाजी अपेक्षित असेल.
-ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ