एएफसी आशियाई चषक पात्रता स्पर्धा : जूनमध्ये कोलकात्यात होणार आयोजन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2023 एएफसी आशियाई चषक पात्रतेच्या अंतिम स्पध्sा&साठी भारताला गट ड मध्ये हाँगकाँग, अफगाणिस्तान, कंबोडिया यांच्यासह स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या जूनमध्ये कोलकात्यात होणार आहे.
कौलालंपूर येथील एएफसीच्या मुख्यालयात या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. 8 जून रोजी भारताची लढत कंबोडियाविरुद्ध झाल्यानंतर 11 जून रोजी अफगाणविरुद्ध, 14 जून रोजी हाँगकाँगविरुद्ध लढती होतील. कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर सर्व सामने होणार आहेत. सहभागी 24 संघांचे सहा गट करण्यात आले आहेत. यातील सहा गटविजेते आणि पाच दुसऱया स्थानावरील सर्वोत्तम संघ यांना 2023 मध्ये चीनमध्ये होणाऱया एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. 2022 फिफा वर्ल्ड कप व 2023 एएफसी आशियाई चषक पात्रतेच्या दुसऱया फेरीत भारताने गट ई मध्ये तिसरे स्थान मिळवित पात्रतेच्या अंतिम फेरीसाठी स्थान मिळविले होते.
‘ड्रॉ चांगले किंवा वाईट कसेही असू शकतात. पण आम्हाला आमचे काम चोखपणे पार पाडण्याची गरज आहे,’ असे भारताचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक म्हणाले. गटातील अन्य संघांबाबत बोलताना त्यांनी आपल्या खेळाडूंना गांभीर्याने आपापली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.
‘अफगाण हा आपल्यासाठी नेहमीच अवघड संघ ठरलेला आहे. आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळण्याचा अनुभव असलेले खेळाडू त्यांच्या संघात आहेत. ब्राझीलचे तीन खेळाडू संघात सामील झाल्याने हाँगकाँग संघाची ताकद वाढली आहे तर इंग्लंड व न्यूझीलंडचे एकेक खेळाडूंही त्यात सामील होण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांचे अन्य बरेच खेळाडू देशाबाहेर खेळत असतात. प्रतिस्पर्धी कसेही असले तरी आम्हाला क्षमता सिद्ध करून दाखवण्याची गरज आहे. आम्ही घरच्या मैदानावरच खेळत असल्याने चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे खेळाडू प्रेरणादायक खेळ करू शकतील,’ अशी अपेक्षा स्टिमॅक यांनी व्यक्त केली.
मेच्या पहिल्या आठवडय़ापासून या स्पर्धेच्या तयारीसाठी कोलकात्यात शिबिर घेण्याची स्टिमॅक यांची योजना आहे. मात्र एटीके मोहन बागान व मुंबई सिटी एफसीचे किमान अर्धा डझन खेळाडू एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यात गुंतलेले असतील. त्यामुळे ते 25 व 29 मे नंतरच शिबिरात दाखल होऊ शकतील. याशिवाय एटीके मोहन बागानचे खेळाडूंही एएफसी कपमध्ये खेळण्याची शक्यता असल्याने त्यांचे खेळाडूंही 25 मेपर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाहीत, असे स्टिमॅक यांनी सांगितले. दोन्ही क्लबचे मिळून 12 हून अधिक खेळाडू राष्ट्रीय संघाचे सदस्य आहेत. अशा परिस्थितीत शिबिरात सर्व खेळाडू केव्हा उपलब्ध होऊ शकतील, हे पहावे लागणार आहे, असेही ते म्हणाले. भारताचे दोन आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचे सामने बहरीन व बेलारुसविरुद्ध 23 व 26 मार्च रोजी होणार आहेत.