ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत-चीनध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी आज दोन्ही देशांत कोअर कमांडर स्तरावरील सातवी बैठक होणार आहे.
भारतीय हद्दीतील चुशूल-मोल्डो बॉर्डर पॉईंटवर ही बैठक होणार असून, या बैठकीला दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होणार आहे. भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ या बैठकीला हजर राहणार आहे.
आतापर्यंत दोन्ही देशांच्या कोअर कमांडर स्तरावर सहा बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी सहमती दर्शवली. मात्र, चीनकडून सातत्याने सीमेवर आगळीक केली जात असून, घुसखोरीचेही प्रयत्न केले जात आहेत. चीनचे घुसखोरीचे प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडले असले, तरी सीमेवरील तणाव कायम आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी आज सातवी बैठक होत आहे.