वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :
सार्वजनिक जीवनात स्वतःला ‘कुशाग्र’ (जीनियस) संबोधिणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इतिहास आणि भूगोलाच्या ज्ञानाबद्दल अत्यंत विचित्र दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. भारताची सीमा चीनला लागून असल्याचे ट्रम्प यांना ज्ञात नसल्याचा युक्तिवाद पुलित्झर पुरस्कारविजेते राहिलेल्या अमेरेकच्या दोन पत्रकारांनी स्वतःच्या पुस्तकात केला आहे. इतिहास आणि भूगोलसंबंधी ट्रम्प यांच्या ‘अज्ञाना’ने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही हैराण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारत आणि चीनदरम्यान कुठलीच सीमा नसल्याचे उद्गार ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत काढले होते. या विधानातून ट्रम्प यांच्या ‘तोकडय़ा’ भौगोलिक ज्ञानाचा खुलासा झाला होता अशा प्रकारचे कथित किस्से अमेरिकेच्या दोन पत्रकारांनी स्वतःच्या पुस्तकात मांडले आहेत. फिलीप रुकर आणि कॅरोल डी लियोनिंग यांच्या 417 पानी ‘अ व्हेरी स्टेबल जीनियस’ या पुस्तकात अध्यक्षपदावरील ट्रम्प यांच्या पहिल्या तीन वर्षांमधील अनेक कथित घटना मांडण्यात आल्या आहेत.
पुलित्झरविजेत्यांचे पुस्तक
उद्योगजगतातून राजकारणात प्रवेश केलेल्या ट्रम्प यांनी 2016 मध्ये अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवून 20 जानेवारी 2017 रोजी पद स्वीकारले होते. पण ट्रम्प यांनी भारत-चीनसंबंधी केलेल्या टिप्पणीचे वर्ष वॉशिंग्टन पोस्टने दिले नाही. ट्रम्प आणि रशियासंबंधी स्वतःच्या वृत्तांकनासाठी दोन्ही पत्रकारांना 2018 चा पुलित्झर पुरस्कार प्राप्त झाला होता.
दोन्ही नेत्यांमध्ये मैत्री
ट्रम्प यांच्या भौगोलिक ज्ञानाचे आकलन झाल्यारव मोदींना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांच्या हावभावातून त्यांची स्तब्धता स्पष्ट झाल्याचा दावा दोन्ही पत्रकारांनी केला आहे. भारत आणि चीनदरम्यान 3488 किलोमीटर लांबीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असून दोघांमधील सीमा वाद अद्याप कायम आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संबंध अत्यंत घनिष्ठ आहेत. 2019 मध्ये दोन्ही नेत्यांची 4 वेळा भेट झाली होती. यात ह्युस्टनमध्ये आयोजित ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम सामील असून यात दोन्ही नेते उपस्थित होते. सप्टेंबर 2019 मध्ये अमेरिकेच्या दौऱयादरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना भारत दौऱयाचे निमंत्रण दिले होते.