वृत्तसंस्था/ मस्कत
महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत रविवारी येथे विद्यमान विजेत्या भारताचा दुसरा सामना जपानविरुद्ध खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने दणकेबाज विजयी सलामी देताना पहिल्या सामन्यात मलेशियाचा 9-0 असा दणदणीत पराभव केला होता.
या स्पर्धेत विद्यमान विजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या मोहिमेला शानदार प्रारंभ करताना मलेशियाचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. रविवारी होणाऱया जपानबरोबरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघ पुन्हा मोठय़ा गोलफरकाने विजय मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.
जपानच्या महिला हॉकी संघाने या स्पर्धेत विजयी सलामी देताना शुक्रवारच्या सामन्यात सिंगापूरवर 6-0 अशी एकतर्फी मात केली आहे. अलीकडेच भारत आणि जपान यांच्यात हॉकी कसोटी मालिका खेळविली गेली. 2019 साली झालेल्या या हॉकी कसोटी मालिकेत भारताने जपानवर 2-1 अशी मात केली होती. मस्कतमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा आपल्या गटातील शेवटचा सामना सोमवारी सिंगापूरबरोबर होणार आहे.