वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शुक्रवारपासून येथील दिल्ली जिमखाना क्लबवरील ग्रास कोर्टवर डेन्मार्कविरुद्ध होणाऱया डेव्हिस चषक वर्ल्ड गुप 1 प्लेऑफ लढतीत भारताचे पारडे जड असेल, असे मत दुहेरीचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णाने व्यक्त केले.
‘ग्रास कोर्ट हे आपले संघ बलस्थान आहे, यामुळेच आम्ही या लढतीसाठी ग्रास कोर्ट निवडले आहे. याशिवाय या लढतीत आम्हाला होम ऍडव्हांटेजही मिळणार आहे. त्यामुळेच ग्रास कोर्टवर आम्हाला डेन्मार्कवर विजय मिळविण्याची चांगली संधी आहे, असे मला वाटते,’ असे बोपण्णा म्हणाला. बोपण्णाने अलीकडेच झालेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत रामकुमार रामनाथनसमवेत दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. मात्र डेन्मार्कविरुद्ध त्याचा साथीदार कोण असेल, हे सांगण्याचे त्याने टाळले. युकी भांब्री व रामकुमार दोघेही दुहेरीत खेळू शकतात, यापैकी एक पर्याय निवडला जाईल, असे तो म्हणाला. भारत व डेन्मार्क यांच्यातील सप्टेंबर 1984 नंतरची ही पहिलीच लढत असेल. त्यावेळी डेन्मार्कने भारतावर 3-2 अशी मात केली होती.