वृत्तसंस्था /नवी दिल्ली
यजमान भारत आणि डेन्मार्क यांच्यातील डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या विश्व गट-1 प्ले ऑफ लढतीला शुक्रवारपासून येथील दिल्ली टेनिस क्लबच्या ग्रासकोर्टवर प्रारंभ होणार आहे.
दिल्ली टेनिस संघटनेच्या कोर्टवर गवत ठेवण्यात आल्याने त्याचा लाभ भारतीय संघाला अधिक होईल, अशी अपेक्षा आहे. ही लढत चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय डेव्हिस संघातील युकी भांब्री, रामकुमार रामनाथन, रोहन बोपण्णा, डी. शरण हे प्रमुख टेनिसपटू आहेत. भारतीय टेनिस क्षेत्रातील सध्या युकी भांब्री हा सर्वात दर्जेदार टेनिसपटू म्हणून ओळखला जातो. त्याचा संघात समावेश असल्याने या लढतीत भारताचे पारडे जड वाटते. दुखापतीमुळे गेल्या चार वर्षांच्या कालावधीत भांब्रीला टेनिसपासून अलिप्त रहावे लागले होते.
शुक्रवारी रामकुमार रामनाथन आणि डेन्मार्कचा ख्रिस्टेन सिगार्ड यांच्यात पहिला एकेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजता खेळविला जाईल. त्यानंतर दुसरा एकेरी सामना युकी भांब्री आणि डेन्मार्कचा मायकेल टॉर्पेगार्ड यांच्यात होणार आहे. शनिवारी रोहन बोपण्णा व डी. शरण यांचा दुहेरीचा सामना डेन्मार्कच्या इंग्लीडेसन आणि निल्सन यांच्यात होणार आहे. या सामन्याला सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल. रामकुमार रामनाथन व टॉर्पेगार्ड यांच्यात परतीचा एकेरी सामना त्यानंतर युकी भांब्री व सिगार्ड यांच्यात परतीचा शेवटचा एकेरी सामना खेळविला जाईल.
डेव्हिस चषक स्पर्धेत भारतीय संघाला विश्व गट-1 पहिल्या फेरीच्या लढतीत फिनलँडकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताने प्ले ऑफ गटात खेळावे लागत आहे. डेन्मार्क संघाने डेव्हिस चषक स्पर्धेच्या विश्व-गट 2 लढतीत मोरोक्कोचा पराभव करत प्ले ऑफ गटात प्रवेश केला आहे. 1984 नंतर भारत आणि डेन्मार्क यांच्यात या स्पर्धेत पहिल्यांदा ही लढत होत आहे. 1984 सालाच्या झालेल्या लढतीत भारताने डेन्मार्कवर 3-2 अशी मात केली होती.