कर्णधार नात्याने विराटसमोर अनेक आव्हाने, दक्षिण आफ्रिकेतील विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचे मुख्य लक्ष्य
सेंच्युरियन / वृत्तसंस्था
भारतीय संघ आजपासून (रविवार दि. 26) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱया पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी कर्णधार नात्याने विराट कोहलीसमोर अनेक आव्हाने आ वासून उभे ठाकलेली असणार आहेत. उत्तम संघनिवड करण्याचे आव्हान असतानाच विराट कोहलीसमोर दक्षिण आफ्रिकन भूमीत पहिलावहिला मालिकाविजय खेचून आणण्याचे शिवधनुष्यही खुणावत असणार आहे. आजच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल.
पाचव्या क्रमांकासाठी अद्याप पारख न झालेल्या श्रेयस अय्यरला संधी द्यावी की खराब फॉर्ममधील, अनुभवी अजिंक्य रहाणेला आणखी एकदा मैदानात उतरवावे, हा कठीण पेच भारतीय संघाला येथे सर्वप्रथम सोडवावा लागेल. पाचवा गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकुरला निवडावे की अनुभवी इशांत शर्माला पुन्हा एकदा आजमावून पहावे, हे देखील निश्चित करावे लागेल.
यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीत संघव्यवस्थापनाने अजिंक्य रहाणे व इशांत शर्मा या दोघांनाही दुखापतीमुळे ‘विश्रांती’ देत असल्याचे जाहीर केले होते. पण, आजही अंतिम एकादशमध्ये या उभयतांचा समावेश नसेल तर त्यांना ‘वगळले गेले’, हे निश्चित असणार आहे.
1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पहिला ऐतिहासिक दौरा करणाऱया भारतीय संघाला आजवर त्यांच्या भूमीत एकही मालिकाविजय संपादन करता आलेला नाही. पण, तूर्तास दक्षिण आफ्रिकन संघ पूर्वीइतका अजिबात बलाढय़ राहिलेला नसून अनेक आघाडय़ांवर ते मोठय़ा संक्रमणातून जात आहेत. याचा लाभ घेण्याची संधी विराटसेनेकडे असेल. त्याचे ते सोने करु शकणार का, हे या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्पष्ट होणार आहे.
यजमान दक्षिण आफ्रिकन संघात अनुभवीपेक्षा युवा खेळाडूंचाच अधिक भर राहिला असून या संघाला अननुभवाचा फटका बसणार का, हे मालिकेत दिसून येईल. घरच्या मैदानावर खेळण्याची संधी, ही मात्र त्यांची मोठी जमेची बाजू असेल आणि त्यावरच मालिकेत विजय संपादन करण्याचा त्यांचा मानस असणार आहे. किंग कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजाला कसे नामोहरम करायचे, हा त्यांच्यासमोर अर्थातच यक्षप्रश्न असेल. दक्षिण आफ्रिकेच्या सध्याच्या संघातील कर्णधार डीन एल्गार (69 कसोटी) व वरिष्ठ यष्टीरक्षक तेम्बा बवूमा (53 कसोटी) असे दोनच खेळाडू 50 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेले आहेत.
जलद गोलंदाज कॅगिसो रबाडा कितपत उपद्रवी ठरणार, यावर दक्षिण आफ्रिकन संघाचे आव्हान बऱयाच अंशी अवलंबून असेल. फिरकीपटू केशव महाराजची मात्र भारतीय फलंदाजांना फारशी चिंता नसेल, असे चित्र आहे.
विराटला सूर सापडणे आवश्यक
भारतीय संघातर्फे कर्णधार विराट कोहलीला सूर सापडणे विशेष महत्त्वाचे असणार आहे. विराटला 2019 पासून एकही कसोटी शतक झळकावता आलेले नाही. शिवाय, यादरम्यान त्याची सरासरी 30 पेक्षाही कमी राहिलेली आहे. अर्थातच, या दोन्ही बाबी त्याच्या लौकिकाला साजेशा नाहीत. स्वतः विराटही या मालिकेत लक्षवेधी योगदान देण्यासाठी महत्त्वाकांक्षी असू शकतो.
सराव सत्रात विराट उत्तम बहरात दिसून आला असून योग्य फटके निवडले तर दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीचा त्याने समाचार घेतल्यास यात आश्चर्याचे कारण नसेल. अर्थात, विराटला उपकर्णधार केएल राहुलची साथ लाभणेही तितकेच महत्त्वाचे असेल. याशिवाय, चेतेश्वर पुजाराकडून धावा होणे आवश्यक असणार आहे. पाचव्या स्थानी रहाणे व अय्यर यांच्यापैकी कोण उतरेल, त्यांच्यासमोर डय़ुआन ऑलिव्हिएरच्या बॅक ऑफ लेंग्थ माऱयाला सामोरे जाण्याचे मुख्य आव्हान असेल.
तूर्तास, अजिंक्य रहाणे पूर्ण निष्प्रभ ठरत आला असून दुसरीकडे, रिषभ पंतची फलंदाजी विदेशी खेळपट्टय़ांवर अधिक बहरते, याची प्रचिती येथेही येणार का, याची उत्सुकता असेल. ब्रेक घेऊन ताजातवाना होत संघात परतलेला जसप्रित बुमराह या लढतीत वरचष्मा गाजवण्यात यशस्वी ठरला तर त्यातही आश्चर्याचे कारण नसेल. बुमराह व शमी यांनी दक्षिण आफ्रिकेची आघाडी फळी गारद केली तर रविचंद्रन अश्विनसमोर त्यांची मधली व तळाची फळी फारशा धावा जमवू शकेल, असे चित्र नाही.
भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण
26 ते 30 डिसेंबर / पहिली कसोटी / दुपारी 1.30 पासून / सेंच्युरियन
3 ते 7 जानेवारी / दुसरी कसोटी / दुपारी 1.30 पासून / जोहान्सबर्ग
11 ते 15 जानेवारी / तिसरी कसोटी / दुपारी 2 पासून / केपटाऊन
भारताची द. आफ्रिकन भूमीत कसोटीतील कामगिरी
मालिका/ स्पर्धा / हंगाम / विजयी संघ-निकाल / फरक (एकूण सामने)
भारताचा द. आफ्रिका दौरा / 1992-93 / द. आफ्रिका / 1-0 (4)
भारताचा द. आफ्रिका दौरा / 1996-97 / द. आफ्रिका / 2-0 (3)
भारताचा द. आफ्रिका दौरा / 2001-02 / द. आफ्रिका / 1-0 (2)
भारताचा द. आफ्रिका दौरा / 2006-07 / द. आफ्रिका / 2-1 (3)
भारताचा द. आफ्रिका दौरा / 2010-11 / अनिर्णीत / 1-1 (3)
भारताचा द. आफ्रिका दौरा / 2013-14 / द. आफ्रिका / 1-0 (2)
स्वातंत्र्य चषक (भारत आफ्रिकेत) / 2017-18 / द. आफ्रिका / 2-1 (3).