मालिकेत आघाडी घेतल्याने भारताचे पारडे जड, यजमनांसमोर मात्र पाहुण्यांना रोखण्याचे मोठे आव्हान
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
भारत व यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी येथे (आज) सोमवारपासून सुरू होत असून युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाला नवा इतिहास निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. हा सामना जिंकून या ‘रेनबो नेशन’मध्ये पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
बॉक्सिंग डे कसोटीत भारताने सेंच्युरियन किल्ला प्रथमच सर केल्यानंतर आता नव्या वर्षात द.आफ्रिकेतील भारतासाठी ‘होम’ असलेल्या जोहान्सबर्गमधील भारतीय रेकॉर्ड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. 2018 मध्ये याच मैदानावर भारताने शानदार विजय मिळवित भारताच्या एका सर्वोत्तम संघनिर्मितीची पायाभरणी केली होती. त्यावेळची खेळपट्टीही अंडरप्रिपेअर्ड होती आणि अशा खेळपट्टीवर विजय मिळवित जगातील कोणत्याही संघाला हरविण्याचा नवा विश्वास संघात निर्माण झाला होता. गेल्या चार वर्षात सातत्याने त्याची प्रचिती संघाने आणून दिली असून ते आता थांबण्याच्या मूडमध्ये नाहीत.
हा सामना जिंकल्यास कर्णधार विराट कोहलीची गणना भारताच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एकमध्ये होऊ शकेल. न्यूझीलंड वगळता सेना (एसईएनए) या चार प्रमुख देशांत तीन मालिका जिंकल्याचा पराक्रम त्याच्यावर नावावर नेंद होईल. ग्रॅम स्मिथच्या काळात दक्षिण आफ्रिका संघात जो दमदारपणा होता, त्याची उणीव आताच्या संघात दिसत असल्याने भारताला मालिका जिंकण्याची सुवर्णसंधीच मिळाली आहे. हाशिम आमलाचा दर्जा, अष्टपैलू कॅलिसचे सातत्य, डेल स्टीनचे एक्स फॅक्टर, मॉर्नी मॉर्कलचे सातत्य यांची उणीव या संघाला प्रकर्षाने जाणवत आहे. त्यात आता क्विन्टॉन डी कॉकने निवृत्ती घेतल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. त्यामुळे भारताच्या लाईनअपवर मात करून सामना जिंकणे त्यांना खूपच कठीण आव्हान ठरू शकते. रबाडा एकटा भार पेलतो आहे, त्याला एन्गिडीचीही चांगली साथ मिळत आहे, पण डी कॉकच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असेल.
25 वर्षीय रेयान रिकेलटन या डॅशिंग यष्टिरक्षक-फलंदाजाला कसोटी पदार्पणाची संधी मिळणार असली तरी स्थानिक स्पर्धेत धावा जमविण्याइतके बुमराह, शमी यांच्यासमोर धावा जमविणे सोपे असणार नाही, या वास्तवाला त्याला सामोरे जावे लागेल. वियान मल्डर धोंडशिरेच्या दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला असल्याने डुआन ऑलिव्हियरला त्याच्या जागी घेतले जाईल. पण त्यालाही अनुभवी भारतीय फलंदाजांना गोलंदाजी करणे कठीण जाऊ शकते. भारतीय फलंदाजही यावेळी पहिल्या सामन्यापेक्षा सरस कामगिरी करण्याची जास्त अपेक्षा आहे.
बीसीसीआयशी पंगा घेतल्यानंतर कोहलीला कळून चुकले आहे की, मंडळात आता पहिल्यासारखे आपले वजन राहिलेले नाही. त्यामुळे त्याच्यावरील एक ओझे कमी झाले असल्याने तो फलंदाजीवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो. गेल्या दोन वर्षात त्याच्याकडून तीन आकडी धावसंख्या रचली गेली नसली तरी त्याची धावांची भूक अजूनही कायम आहे. तो या सामन्यात ही अपेक्षा पूर्ण करेल, अशी आशा केली जात आहे. पहिल्या कसोटीच्या आधी व नंतर कोहली मीडियासमोर आला नव्हता. त्याच्याऐवजी प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड पुढे आले होते. या सामन्यावेळीही द्रविडच मीडियाला सामोरे जाणार आहेत. अंतर्गत बाबीवर परिषदेत चर्चा होणार नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यांनी ‘आग’ विझविण्याचे काम रविवारी एकदा केले आहे. त्यामुळे नंतरही चर्चा फक्त क्रिकेटवरच होईल, यावर त्यांचा कटाक्ष असेल. मात्र कोहलीला या सामन्यात पाच गोलंदाजच हवे असल्याने संघात काही बदल होण्याची शक्यता नाही.
पाच गोलंदाज खेळविताना मागच्या कसोटीत भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील गुणांचा दंड सोसावा लागला होता. तरीही स्पिनर आर. अश्विनला कायम ठेवत जोहान्सबर्गची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीस पोषक असल्याने चार वेगवान गोलंदाजांना खेळविले जाईल. पहिल्या कसोटीत गोलंदाजीत फारशी चमक दाखवू न शकलेल्या शार्दुल ठाकुरच्या जागी उमेश यादवचा विचार होऊ शकतो. पण महत्त्वाच्या क्षणी विकेट घेण्याची क्षमता व फलंदाजी यात तो यादवपेक्षा उजवा ठरत असल्याने त्याला वगळले जाण्याची शक्यता कमी वाटते.
फलंदाजांपैकी एखादा अनफिट असला तर बॅटिंग लाईनअपमध्ये बदल होऊ शकतो. पाच प्रमुख फलंदाज आणि रिषभ पंत यांनाच कायम ठेवले जाईल. पुजारा व रहाणे यांनी अपेक्षित कामगिरी केलेली नसली तरी द्रविड त्यांना आणखी संधी देऊ शकतात. फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी श्रेयस अय्यर व हनुमा विहारी यांना निवडण्याचे संकेत दिले होते. पण द्रविड त्यांना इतक्यातच संधी देणार नाहीत, असे दिसते. भारतीय संघाचे पारडे या सामन्यात जड असल्याने द.आफ्रिकेसमोर मालिका बरोबरीत आणणे खूपच आव्हानात्मक ठरणार आहे.
संभाव्य संघ
भारत ः कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयांक अगरवाल, पुजारा, श्रेयस अय्यर, पंत, अश्विन, शार्दुल ठाकुर, बुमराह, शमी, सिराज, रहाणे, वृद्धिमान साहा, जयंत यादव, प्रियांक पांचाळ, उमेद यादव, हनुमा विहारी, इशांत शर्मा.
द.आफ्रिका ः एल्गार (कर्णधार), बवुमा (उपकर्णधार), रबाडा, सारेल एर्वी, ब्युरॉन हेन्ड्रिक्स, जॉर्ज लिन्डे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, ऐडन मार्करम, वियान मल्डर, कीगन पीटरसन, रासी व्हान डर डय़ुसेन, काईल व्हेरेनी, मार्को जान्सन, ग्लेन्टन स्टुरमन, प्रेनेलन सुब्रायेन, सिसांदा मगाला, रेयान रिकेलटन, डुआन ऑलिव्हियर.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून.