ऑकलंड / वृत्तसंस्था :
भारतीय संघ आजपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया पाच टी-20 विश्वचषकाची मालिका खेळवली जात असताना ऑक्टोबरमधील आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी हाच मुख्य अजेंडा असणार आहे. न्यूझीलंडसमोर अनेक खेळाडूंच्या दुखापतींची चिंता आहे तर भारतासमोर प्रतिकूल खेळपट्टीचे आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, आजच्या पहिल्या लढतीला दुपारी 12.20 वाजता सुरुवात होणार आहे.
बहुतांशी विदेश दौऱयांप्रमाणेच येथेही भारतीय संघासाठी प्रत्यक्ष लढतीला लवकर सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची वनडे खेळल्यानंतर केवळ पाचच दिवसात भारताची न्यूझीलंडमधील ही पहिली टी-20 होत आहे.
भारतीय संघ मंगळवारी ऑकलंडमध्ये दाखल झाला आणि बुधवारी त्यांनी विश्रांती घेणे पसंत केले. त्यानंतर गुरुवारी त्यांनी पहिल्या सराव सत्राला सुरुवात केली. भारतीय संघ प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धेपूर्वी काही प्रयोग राबवून पाहणार असून त्यासाठी ही मालिका विशेष महत्त्वाची ठरु शकते.
शिखर धवन, हार्दिक पंडय़ा, दीपक चहर व भुवनेश्वर कुमार सध्या दुखापतीने त्रस्त असले तरी त्यांची जागा सक्षमतेने भरुन काढणारी नवी फळी सज्ज झाली असून यात यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलबाबत भारतीय व्यवस्थापन विशेष महत्त्वाकांक्षी आहे. शिखर धवनला विश्रांती दिली असताना राहुलने मिळालेल्या संधीचे सोने केले आणि नंतर रोहितला विश्रांतीला देण्यात आल्यानंतर धवनसमवेतही आपली जबाबदारी चोख पार पाडली.
पांडे, श्रेयस, पंतचा सराव
गुरुवारी, मनीष पांडे, श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांनी एकत्रित फलंदाजीचा सराव केला तर संजू सॅमसन फक्त पॅड घालून हजर होता. पहिल्या टी-20 वलढतीत केरळच्या या फलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते. भारताने पाच गोलंदाज खेळवले व शिवम दुबेचा विचार केला नाही तर पंत व पांडे या दोघांनाही अंतिम संघात स्थान अपेक्षित असेल. वॉशिंग्टन सुंदर व रविंद्र जडेजा हे दोन अष्टपैलू खेळाडू येथे उपलब्ध असतील.
यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव ही जोडी 2019 वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर एकदाही एकत्रित खेळलेली नाही. हे चित्र येथे तरी बदलणार का, हे पहावे लागेल. जलद गोलंदाजीच्या आघाडीवर मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह यांचा समावेश जवळपास निश्चित असून शार्दुल ठाकुर व नवदीप सैनी यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
गतवर्षी न्यूझीलंडने भारताला 2-1 असे पराभूत केले होते. किवीज संघाने त्यानंतर लंकन दौऱयातही 2-1 अशा फरकाने टी-20 मालिका जिंकली तर इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली होती. मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र त्यांना 0-3 अशा एकतर्फी फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेत ते ईश सोधी व मिशेल सॅन्टनर या दोघाही फिरकीपटूंना खेळवले जाणार का, याची येथे उत्सुकता असेल.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, स्कॉट कगेलेईन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डे ग्रँडहोम, टॉम ब्रुस, डॅरेल मिशेल, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट (यष्टीरक्षक), हमिश बेनेट, ईश सोधी, टीम साऊदी, ब्लेयर टिकनर.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : दुपारी 12.20 वा.