भारतीय संघासह यजमानांसमोर देखील दुखापतींचे ग्रहण
हॅमिल्टन / वृत्तसंस्था
काही मुख्य खेळाडूंच्या पाठीशी दुखापतीचा ससेमिरा लागलेला असताना भारतीय संघ आज (दि. 5) यजमान न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत मुकाबला देत आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत पृथ्वी शॉसारख्या युवा खेळाडूंना महत्त्वपूर्ण संधी लाभेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार आजच्या लढतीला सकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.
गतवर्षी संपन्न झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर भारतासाठी ही तिसरी मालिका आहे. विदेशात विंडीजविरुद्ध व मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या त्या दोन्ही मालिकांमध्ये भारताने विजय संपादन केला. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ मात्र लॉर्डसवर इंग्लंडविरुद्ध विश्वचषक फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर प्रथमच वनडे खेळणार आहे.
भारत-न्यूझीलंडचे संघ 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये यापूर्वी आयसीसी वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतच आमनेसामने भिडले होते आणि मँचेस्टरमधील त्या लढतीत न्यूझीलंडने भारताचे आव्हानही संपुष्टात आणले होते. दोन दिवसात विभागल्या गेलेल्या त्या लढतीत भारताला 18 धावांनी नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यानंतर किवीज भूमीत मात्र भारताने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 5-0 असा दणकेबाज मालिकाविजय संपादन करत त्या अपयशाची भरपाई करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. अर्थात, आता वनडे मालिकेत दोन्ही संघातील बरेच महत्त्वाचे खेळाडू उपलब्ध नसतील. त्यामुळे, त्यांची गैरहजेरी जाणवू शकते.
भारतीय सलामीवीर रोहित शर्मा पोटरीच्या दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला असून शिखर धवन, हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार व दीपक चहर त्यापूर्वीच दुखापतींचे बळी ठरले आहेत. न्यूझीलंडचा दिग्गज कर्णधार केन विल्यम्सन देखील दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असून ट्रेंट बोल्ट यापूर्वीच बाहेर फेकला गेला होता.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी.
न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार व यष्टीरक्षक), मार्टिन गप्टील, रॉस टेलर, कॉलिन डे ग्रँडहोम, जिम्मी नीशम, स्कॉट कग्लेईन, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोल्स, मिशेल सॅन्टनर, हमिश बेनेट, ईश सोधी, टीम साऊदी, काईल जेमिसन, मार्क चॅपमन.
सामन्याची वेळ : सकाळी 7.30 पासून.
भारतीय संघातर्फे आज दोघा सलामीवीरांचे वनडे पदार्पण
आज होणाऱया लढतीच्या माध्यमातून मयांक अगरवाल व पृथ्वी शॉ वनडे पदार्पण नोंदवतील, अशी अपेक्षा आहे. दोन्ही सलामीवीरांनी एकाच वेळी वनडे पदार्पण करण्याची ही 2016 नंतरची पहिली वेळ असेल. 2016 मध्ये केएल राहुल व करुण नायर यांनी झिम्बाब्वेविरुद्ध सलामीला उतरत वनडे पदार्पण केले होते. त्यापूर्वी 1974 मध्ये सुनील गावसकर व सुधीर नाईक यांनी इंग्लंडविरुद्ध तर 1976 मध्ये पार्थसारथी शर्मा-दिलीप वेंगसरकर यांनी न्यूझीलंडविरुद्ध सलामीवीर या नात्याने वनडे पदार्पण केले होते.