अमेरिकेच्या स्वतःच्या नागरिकांना दिला इशारा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानात राहत असलेल्या स्वतःच्या नागरिकांसाठी इशारा दिला आहे. अमेरिकेने दोन्ही देशांसाठी दुसऱया आणि तिसऱया स्तरावरील प्रवास सूचना जारी केल्या आहेत. बायडेन प्रशासनाने दहशतवाद आणि सांप्रदायिक हिंसेचा दाखला देत अमेरिकेच्या नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास करण्यावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. तर गुन्हे आणि दहशतवादाचा दाखला देत भारतात जाणाऱयांनी खबरदारी घ्यावी असे म्हटले गेले आहे.
दहशतवादाचा धोका तसेच सशस्त्र संघर्षाच्या भीतीपोटी भारत-पाकिस्तान सीमेच्या 10 किलोमीटरच्या कक्षेत प्रवास न करण्याचे आवाहन अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने केले आहे. बलात्कार हा भारतातील वाढत्या गुन्हय़ांपैकी एक आह. लैंगिक शोषणासारखे हिंसक गुन्हे पर्यटनस्थळी तसेच अन्य ठिकाणी घडल्याचे सूचनापत्रकामध्ये म्हटले गेले आहे.
दहशतवाद्याकंडून पर्यटनस्थळे, परिवहन स्थानके, बाजार/मॉल आणि सरकारी संस्थांवर हल्ला केला जाऊ शकतो. पश्चिम बंगालचा पश्चिम भाग, पूर्व महाराष्ट्र आणि उत्तर तेलंगणाच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये अमेरिकेच्या नागारिकांना आपत्कालीन सेवा प्रदान करण्याची अमेरिकेच्या प्रशासनाची क्षमता मर्यादित आहे, कारण अमेरिकेच्या कर्मचाऱयांना या क्षेत्रांमध्ये प्रवास करण्यासाठी विशेष अनुमती घ्यावी लागत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पाकिस्तानात अपहरणाचा धोका
अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने पाकिस्तानसाठी देण्यात आलेल्या इशारावजा सूचनांमध्ये दहशतवादी हल्ला तसेच अपहरणाचा धोका असल्याचे म्हटले आहे. बलूचिस्तान प्रांत आणि खैबर पख्तूनख्वा प्रांताच प्रवास करू नका. तसेच सशस्त्र संघर्षाच्या भीतीमुळे नियंत्रण रेषेनजीकच्या भागांमध्ये न जाण्याची सूचना करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांनी भूतकाळात अमेरिकेचे मुत्सद्दी आणि राजनयिक संस्थांनाही लक्ष्य केले आहे. 2014 नंतर पाकिस्तानच्या सुरक्षा वातावरणात सुधारणा झाली आहे. प्रमुख शहरे विशेषकरून इस्लामाबादमध्ये अधिक सुरक्षा साधने आहेत. पण धोका अद्याप कायम आहे. सुरक्षा स्थितीमुळे अमेरिकेच्या प्रशासनाकडे पाकिस्तानात स्वतःच्या नागरिकांना आपत्कालीन सेवा प्रदान करण्याची मर्यादित क्षमता असल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले.