मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : उत्पादनासाठी 76 हजार कोटींची योजना मंजूर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) बनवण्यासाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) योजना मंजूर करण्यात आली आहे. या प्रकल्पावर सहा वर्षांत 76 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच रुपे डेबिट कार्ड आणि भीम-युपीआय व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्सेन्टिव्ह योजना, जलशक्ती मंत्रालयाच्या योजनांनाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादकांची संपूर्ण परिसंस्था स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी देण्यात आली. यामध्ये सरकार 6 वर्षात 76,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. याअंतर्गत 2.3 लाख कोटी रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. हे अनुदान तीन प्रकारे दिले जाऊ शकते. यामध्ये कंपाऊंड सेमीकंडक्टर वेफर फॅब्रिकेशन, असेंब्लिंग, टेस्टिंग, पॅकेजिंग आणि उत्पादनासाठी युनिटच्या भांडवली खर्चावर 25 टक्के अनुदान निधी दिला जाणार आहे. ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’च्या स्थापनेद्वारे ही योजना चालविली जाणार असून भारत सेमीकंडक्टर निर्मितीचे हब बनेल अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सेमीकंडक्टर आवश्यक
सेमीकंडक्टर हा सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱया प्रमुख घटकांपैकी एक आहे. जगभरात सेमीकंडक्टरचा पुरवठा कमी झाल्यामुळे स्मार्टफोन, लॅपटॉप, कार आणि विविध उत्पादनांच्या उत्पादनावर अलीकडच्या काळात विपरीत परिणाम झाला आहे. मायक्रोचिपच्या कमतरतेमुळे औद्योगिक उत्पादनावर परिणाम होत असताना, सरकारच्या या निर्णयामुळे सेमीकंडक्टर निर्मात्यांना फायदा होणार आहे.
स्टार्टअप कंपन्यांना संधीची द्वारे खुली
सेमीकंडक्टरच्या डिझायनिंग, डेव्हलपमेंट आणि उत्पादनावर काम करणाऱया स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचाही प्रस्ताव आहे. या योजनेंतर्गत उद्योगांमधून 1.7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ शकते असा सरकारचा अंदाज आहे. या योजनेंतर्गत मीडिया टेक, इंटेल क्वालकॉम, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स यासारख्या कंपन्यांना भारतात त्यांचे युनिट्स सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाण्याची अपेक्षा आहे.
जगभरात सेमीकंडक्टरची टंचाई
संपूर्ण जगाला सेमीकंडक्टर पुरवठय़ाच्या कमतरतेची समस्या भेडसावत असताना केंद्र सरकार ही योजना आणण्याच्या तयारीत आहे. सरकार सेमीकंडक्टर प्रात्यक्षिकांसाठी दोन फॅब युनिट्स उभारण्याच्या प्रक्रियेत आहे. या योजनेंतर्गत भारताला सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनवण्याची योजना आहे.