हैदराबाद / वृत्तसंस्था
कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ची निर्मिती करणाऱया हैदराबादमधील भारत बायटेकने आता नाकाद्वारे दिली जाणारी (नेसल) लस तयार करून तिच्या अनुमतीसाठी प्रयत्न चालवले आहेत. या नेसल व्हॅक्सिनची चाचणी पुढील आठवडय़ापासून सुरू होणार असल्याचे समजते. सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) फेब्रुवारी महिन्यामध्ये या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्यास अनुमती दिली होती. ही लस इंटरनेझल म्हणजेच नाकावाटे दिली जाणार आहे. या लसीची सकारात्मक परिणामकारकता सिद्ध झाल्यास ते भारताच्या लसनिर्मिती मोहिमेतील ते एक मोठे यश ठरणार आहे.
‘भारत बायोटेक’ निर्मित लसीच्या चाचणीची सर्व प्रकिया पूर्ण झाली असून पुढील आठवडय़ापासून देशाच्या चार वेगवेगळय़ा भागात प्राथमिक चाचणी घेतली जाणार आहे. या चाचण्यांसाठी पटना, चेन्नई, नागपूर आणि हैदराबाद या शहरांची निवड करण्यात आली आहे. ‘सेंट्रल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया’च्या देखरेखीखाली निवडक स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी होणार आहे. भारत बायोटेकचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी मागील वर्षाच्या अखेरीस नाकावाटे देण्यात येणाऱया लसीसंदर्भात भाष्य केले होते.
वैद्यकीय कचऱयाची समस्या कमी होणार
सध्याच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ हय़ा इंट्रामस्कुलर म्हणजेच पेशींमध्ये दिल्या जाणाऱया लसी मोहिमेमध्ये वापरल्या जात आहेत. या लसींमुळे सिरींग्जसह अन्य वैद्यकीय कचरा मोठय़ा प्रमाणात तयार होत आहे. आता नाकावाटे देण्यात येणारी लस पूर्णपणे वेगळी असून या लसीमुळे लसीकरण आणखीन स्वस्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘भारत बायोटेक’ व्यतिरिक्त अन्य पाच-सहा कंपन्यांकडूनही वेगवेगळय़ा लसनिर्मितीची प्रक्रिया सुरू असून त्यांना मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
लसीकरणात भारताचा नवा विक्रम
एका दिवसात 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना लस
देशात कोरोना महामारीविरुद्ध सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान गुरुवारी एका दिवसात 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आल्याने एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. सर्वव्यापी लसीकरण मोहिमेमुळे सध्या भारताचे नाव जगभर चर्चेत असतानाच एक नवा पल्ला गाठल्याने देशात समाधानाची भावना आहे. आतापर्यंतच्या एकूण आकडय़ांचा विचार केला तर 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण अभियानात 1.77 कोटी डोस दिले गेले आहेत. देशभरात कोरोनाविरुद्ध लसीकरण अभियान वेगाने सुरू आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 10 हजार सरकारी केंद्रे सहभागी आहेत. याशिवाय खासगी रुग्णांलयांमधूनही सशुल्क लसीकरण सुरू करण्यात आले आहे.