वृत्तसंस्था/ ताश्कंत
गुरुवारी येथे महिलांचा आंतरराष्ट्रीय मैत्रिपूर्ण फुटबॉल सामना होणार असून यजमान बेलारुसविरुद्ध एकसंध कामगिरी करून यश मिळविण्याचा भारतीय महिला संघाचा प्रयत्न असणार आहे.
उझ्बेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी भारतीय महिला संघाचे मनोबल उंचावलेलेच आहे. फिफा मानांकनात भारतापेक्षा बऱयाच वरच्या क्रमांकावर असणाऱया उझ्बेकविरुद्ध शानदार प्रदर्शन केले होते. ‘बेलारुस क्रमवारीत आमच्यापेक्षा दोन क्रमांकानी खाली असले तरी त्यांना युरोपियन संघांविरुद्ध खेळण्याची बऱयापैकी सवय झालेली आहे. याशिवाय त्यांचा स्पर्धेचा दर्जाही उच्च आहे. असे असले तरी आमच्या खेळाडूंही या सामन्यासाठी पूर्ण सज्ज झाल्या असून झोकून देत या सामन्यात ते प्रदर्शन करतील, यात शंकाच नाही,’ असे संघाच्या प्रशिक्षिका मेमॉल रॉय सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाल्या.
उझ्बेकविरुद्धच्या सामन्याने भारताला काही सकारात्मक बाबी लक्षात आल्या. त्यामुळे बेलारुसविरुद्ध आम्ही निश्चितच चांगले प्रदर्शन करू, असा विश्वास भारताची अनुभवी गोलरक्षिका आदिती चौहानने व्यक्त केला. डिसेंबर 2020 पासून भारतीय संघ एकत्रित सराव करीत असून पुढील वर्षी भारतात होणाऱया एएफसी आशियाई चषक स्पर्धेची ते तयारी करीत आहेत. बराच काळ एकत्रित असल्याने खेळाडूंमध्ये एकीची भावना निर्माण झाली असल्याचे आदिती चौहान म्हणाली.