वृत्तसंस्था/ लॉसेन
भारत व इंग्लंड यांच्यात होणारे एफआयएच प्रो हॉकी लीगमधील सामने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटन सरकारने भारतातून येणाऱया प्रवाशांचा ‘रेड लिस्ट’ यादीत सोमवारी समावेश केला असल्याने हा निर्णय घेतला गेला आहे.
‘एफआयएच, हॉकी इंडिया व ग्रेट ब्रिटन हॉकी यांनी, निर्माण झालेल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले असून या सामन्यांचे आयोजन पुढे केव्हा करता येईल, याचा विचार करण्यात येत आहे,’ असे एफआयएचने निवेदनाद्वारे सांगितले. नियोजित सामने 8 व 9 मे रोजी होणार होते. असा निर्णय घेण्यात आला असला तरी भारतीय हॉकी संघ मेमध्ये प्रो लीगमधील सामने खेळण्यासाठी युरोप दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात भारतीय संघ स्पेन (15-16 मे), जर्मनी (23-23 मे) यांच्याविरुद्ध सामने खेळेल तर ब्रिटन संघ जर्मनी (12-13 मे), अमेरिका (महिला, 22-23 मे), स्पेन (पुरुष, 22-23 मे) यांच्याविरुद्ध आपल्याच देशात सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातही सामना होणार असून दोन्ही देशांत बायोबबल जाहीर केल्यानंतर या सामन्यासाठी तारीख मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
ब्रिटन सरकारने भारतातील प्रवाशांवर निर्बंध घातल्यामुळे 23 एप्रिलनंतर भारतातून येणाऱया ब्रिटनच्या रहिवाशांना हॉटेलमध्ये 11 रात्री क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. भारतातून येणाऱया अन्य नागरिकांना मात्र पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. भारतात गेल्या 24 तासांत 2 लाख 95 हजार कोव्हिड 19 रुग्ण आढळले आहेत.