आयपीएल स्पर्धा अपेक्षेप्रमाणे संयुक्त अरब अमिरातमध्येच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आणखी एक महिना प्रतीक्षा केली जावी, अशा आशयाची विनंती बीसीसीआय आयसीसीकडे करणार आहे. शनिवारी कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले गेले. आयपीएल स्पर्धेचा उर्वरित टप्पा अपेक्षेप्रमाणे संयुक्त अरब अमिरातमध्येच होईल, हे देखील या बैठकीत निश्चित झाले. 50 मिनिटे चाललेल्या या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
‘आयपीएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीत सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत होतील. याबाबत तारखांची घोषणा नंतर केली जाईल’, असे या बैठकीला हजर असलेल्या एका पदाधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर सांगितले. ‘सप्टेंबरमध्ये भारतात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु असतो आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये 3 मोठी मैदाने आहेत. या घटकांचा सदर निर्णय घेताना प्रामुख्याने विचार केला गेला’, असे या पदाधिकाऱयाने पुढे नमूद केले. ही स्पर्धा दि. 18 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत घेण्याचा मंडळाचा विचार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस भारतात घेतली जावी, असे बहुतांशी सदस्यांना वाटते. पण, याबाबत आताच काही निर्णय घेणे शक्य नाही, ही वस्तुस्थिती असल्याने मंडळाचे थांबा व पहा, असे धोरण असणे साहजिक आहे. आयसीसीमधील बीसीसीआयचे प्रतिनिधी अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिव जय शाह हे आगामी बैठकीत विश्वचषकाबद्दल अंतिम निर्णय घेण्यापूर्वी एक महिन्याचा कालावधी मागून घेतली, हे देखील यावेळी निश्चित केले गेले.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी जारी केलेल्या पत्रकातून सर्व सदस्यांनी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार बीसीसीआय प्रतिनिधींना दिले असल्याचे नमूद केले. विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून उत्पन्नावर कर प्रणालीचा मुद्दा देखील या बैठकीत चर्चेत आणला गेला.
‘आयसीसीला करातून सूट हवी आहे. पण, आम्हाला केंद्राच्या दिशानिर्देशाचे पालन करावेच लागते. तूर्तास, आता मे महिन्यात ऑक्टोबरमधील परिस्थिती कशी असेल, हे सांगणे कठीण असल्याने यावर काहीही निर्णय शक्य नाही’, असे एका सूत्राने यावेळी नमूद केले.
प्रथमश्रेणी खेळाडूंना भरपाईचा मुद्दा
या बैठकीत एका राज्य संघटनेच्या सदस्याने प्रथमश्रेणी खेळाडूंना भरपाईचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, यासाठी अद्याप फॉर्म्युला निश्चित केला गेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले गेले. वास्तविक, गतवर्षी जानेवारीमध्येच सौरभ गांगुली यांनी आर्थिक सहाय्य करण्यास अनुकूलता दर्शवली. पण, भरपाईचा फॉर्म्युला कसा असेल, यावर अद्याप विचार झालेला नाही.
गांगुली, शाह दुबईला जाणार
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिव जय शाह हे सोमवारी दुबईला रवाना होणार असून तेथे ते उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह आयसीसी कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत भारतातील आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल विचार होणार आहे. मुंबईत 3 मैदाने आहेत. पण, पाकिस्तानचा संघ मुंबईला येण्याबाबत अनेक मतमतांतरे असू शकतात, ही देखील बीसीसीआयची आणखी एक अडचण असणार आहे.
बीसीसीआय इंग्लिश खेळाडूंकडे दुर्लक्ष करणार!
आयपीएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळवले जाणार, हे निश्चित असले तरी विशेषतः विदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेविषयी अनेक प्रश्न असणार आहेत. त्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. त्याची माहिती देताना सदर सदस्य म्हणाला, ‘पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट मालिकेमुळे इंग्लंडचे खेळाडू उर्वरित आयपीएल सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. पण, अशा खेळाडूंना उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. जे खेळाडू उपलब्ध असतील, ते उर्वरित टप्प्यात खेळतील. उर्वरित 31 सामने खेळवून पूर्ण करायचे, हा एकच प्राधान्यक्रम आमच्यासमोर असणार आहे’.