वनडे मालिका गमविल्यानंतर विंडीजकडून कडवा प्रतिकार अपेक्षित
वृत्तसंस्था/ कोलकाता
आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टी-20 विश्वचषकावर नजर ठेवत प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असणाऱया रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत विविध कॉम्बिनेशन्स आजमावून पाहणार आहे. यातील पहिला सामना आज (बुधवारी) येथील ईडन गार्डन्सवर प्रेक्षकांविना खेळविला जाणार आहे. हा डे-नाईट सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण तीन सामने याच ठिकाणी होणार आहेत.
गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरात येथे झालेल्या मागील टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला फेव्हरिट मानले जात होते. पण भारताला साखळी फेरीतच या स्पर्धेतून धक्कादायकरीत्या बाहेर पडावे लागले हेते. संघरचनेतील कच्चे दुवे, खेळाडूंचे टेम्परामेंट या स्पर्धेत उघडे पडले आणि कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा खेळणाऱया विराट कोहलीला रिकाम्या हाती परतावे लागले होते. त्याची भरपाई करून नवी संघबांधणी करण्याचा प्रयत्न आता भारतीय संघ करणार आहे. ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया विश्वचषक स्पर्धेआधी भारताचा टी-20 सामन्यांचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.
सलामीसाठी भक्कम जोडी, मध्यफळीतील समस्या व गोलंदाजीतील डावपेच या अडचणी नवा कर्णधार रोहित शर्माला दूर करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. संघात अनेक गुणवान खेळाडू असल्याने रोहितला संघनिवड करताना पेच पडणार आहे. नुकत्याच झालेल्या आयपील लिलावात इशान किशनला जॅकपॉट लागला असून त्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटीला खरेदी केले. सध्या भारतीय संघात असलेल्या दहा खेळाडूंना या लिलावात मोठी रक्कम मिळाली असून त्यात श्रेयस अय्यर (केकेआर 12.25 कोटी), हर्शल पटेल (आरसीबी 10.75 कोटी), शार्दुल ठाकुर (दिल्ली कॅपिटल्स 10.75 कोटी) यांचा समावेश आहे.
केएल राहुल दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. विंडीजविरुद्ध पहिल्या वनडेत रोहितने इशान किशनला सलामीला खेळविले होते. पण नंतर रिषभ पंत व शिखर धवन यांनाही रोहितने आजमावून पाहिले. यावेळी इशानला सलामीस पहिली पसंती दिली जाऊ शकते. याशिवाय पूर्ण बहरात असलेले ऋतुराज गायकवाड व वेंकटेश अय्यर यांचा पर्यायही उपलब्ध आहे. वेंकटेशने आयपीएलमध्ये 320 धावा फटकावल्या तर गायकवाडने 407 धावा झोडपल्या होत्या. मात्र विराट कोहली फॉर्म मिळविण्यासाठी रोहित शर्मासमवेत सलामीला येणार का, हे पाहणेही मनोरंजक ठरेल.
विश्वचषकाआधी भरगच्च कार्यक्रम आहे. त्यामुळे इशानची निवड निश्चित असल्याने यष्टिरक्षक पंतला पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील. यामुळे रोहितला श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव यांना आजमावून पाहता येईल. नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत दोघांनीही भरीव योगदान दिले आहे. मध्यफळीच्या खालच्या क्रमांकावरही शार्दुल ठाकुर, दीपक चहर, हर्शल पटेल यांचे पर्याय उपलब्ध आहेत. पटेलने विश्वचषकानंतर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 6 बाद 140 अशा स्थितीनंतर 11 चेंडूत 18 धावा फटकावत भारताला 7 बाद 184 धावांची मजल मारून देत सर्वांना प्रभावित केले होते.
फिरकीच्या बाबतीत यजुवेंद्र चहलची निवड निश्चित असून राजस्थानचा लेगस्पिनर रवी बिश्नोईला पदार्पणाची संधी मिळते का, हे पहावे लागेल. आयपीएल व स्थानिक क्रिकेटमध्ये प्रभावी प्रदर्शन करीत त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असल्याने त्याला संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
वनडे मालिकेत फ्लॉप शो झाल्यानंतर विंडीज संघ या मालिकेत सुधारित प्रदर्शन करण्यावर भर देईल. या संघात अनेक टी-20 स्पेशालिस्टचा समावेश असून मायदेशात इंग्लंडवर 3-2 असा मालिकाविजय मिळवित हा संघ भारतात दाखल झाला आहे. त्यांची फलंदाजी लाईनअप खोलवर असून आक्रमक फटकेबाजी करणारे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्या बळावर भारताला ते जोरदार टक्कर देण्याची अपेक्षा आहे. जेसन होल्डर बहरात असून त्याने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडेत चार चेंडूत 4 बळी मिळविले होते आणि 27 धावांत 5 बळी अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. ओडियन स्मिथ, अकील हुसेन या अष्टपैलूंच्या बळावर पोलार्डचा संघ चमक दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. याच मैदानावर 2016 मध्ये त्यांनी टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.
ईडन गार्डन्सवर सीएबीने चार खेळपट्टय़ा तयार ठेवल्या असून हवामान थंड असल्याने दवाची दोन्ही संघासमोर समस्या येण्याची शक्यता आहे.
कोहलीला मोकळीक द्या, तो व्यवस्थित खेळेल ः रोहित
तुम्ही मीडियावाले विराटच्या खराब फॉर्मबाबत चर्चा करण्याचे सोडून द्या, म्हणजे तो व्यवस्थित खेळेल. त्याच्यावर कसलेही दडपण नसून त्याच्याकडून लवकरच मोठी खेळी पहावयास मिळेल. दशकाहून अधिक काळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय, त्यामुळे दडपणाची स्थिती कशी हाताळावी, याची त्याला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मची अजिबात चिंता करू नका, त्याला मोकळीक द्या, असे कर्णधार रोहित शर्मा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.
संभाव्य संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई, चहल, सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्शल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव, हरप्रीत ब्रार.
विंडीज ः पोलॉर्ड (कर्णधार), निकोलस पूरन, फॅबियन ऍलेन, डॅरेन ब्रेव्हो, रॉस्टन चेस, शेल्डॉन कॉट्रेल, ड्रेक्स, होल्डर, शाय होप, अकील हुसेन, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल, रोमारिओ शेफर्ड, ओडियन स्मिथ, काईल मेयर्स, हेडन वॉल्श ज्युनियर.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 7 पासून.