40 षटकात 446 धावांची आतषबाजी, दीपक हुडाचे शतक, आयरिश फलंदाजांचीही धावांची बरसात
वृत्तसंस्था / मॅलाहिदे
हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील भारताने आयर्लंडविरुद्ध दुसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला असला तरी आयरिश संघाने यासाठी भारताला अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजवले. भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारत हुडा-सॅमसनच्या 176 धावांच्या भागीदारीमुळे निर्धारित 20 षटकात 7 बाद 225 धावांचा डोंगर रचला. पण, प्रत्युत्तरात आयर्लंडनेही झुंजार फलंदाजी साकारत भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. केवळ अंतिम टप्प्यातील अपयशामुळे त्यांना विजयापासून अवघ्या 4 धावांनी दूर रहावे लागले. त्यांना येथे निर्धारित 20 षटकात 5 बाद 221 धावांपर्यंत मजल मारता आली.
विजयासाठी 226 धावांचे आव्हान असताना आयरिश संघातर्फे बॅलबिर्नेने 37 चेंडूत 60 धावांची आतषबाजी केली तर स्टर्लिंगने 18 चेंडूत 40 धावा फटकावल्या. याला पूरक साथ देत हॅरी टेक्टरने 28 चेंडूत 39, जॉर्ज डॉकरेलने 16 चेंडूत नाबाद 34 तर ऍदेरने 12 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या. पण, उमरान मलिकच्या डावातील शेवटच्या चेंडूवर षटकाराची आवश्यकता असताना ऍदेरला केवळ एक धाव घेता आली आणि हा रोमांचक सामना भारताने अवघ्या 4 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने ही मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 20 षटकात 7 बाद 225 (दीपक हुडा 57 चेंडूत 9 चौकार, 6 षटकारांसह 104, संजू सॅमसन 42 चेंडूत 9 चौकार, 4 षटकारांसह 77, सूर्यकुमार यादव 5 चेंडूत 15, पंडय़ा 9 चेंडूत नाबाद 13. अवांतर 12. मार्क ऍदेर 3-42, जोश लिटल 2-38, क्रेग यंग 2-35).
आयर्लंड ः 20 षटकात 5 बाद 221 (बॅलबिर्ने 37 चेंडूत 3 चौकार, 7 षटकारांसह 60, पॉल स्टर्लिंग 18 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह 40, हॅरी टेक्टर 28 चेंडूत 5 चौकारांसह 39, जॉर्ज डॉकरेल 16 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 34, मार्क ऍदेर 12 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह नाबाद 23. अवांतर 20. भुवनेश्वर 1-46, हर्षल पटेल 1-54, रवी बिश्नोई 1-41, उमरान मलिक 1-42).