भुवनेश्वर/ वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो-लीग हॉकी स्पर्धेत शनिवारी येथे यजमान भारत आणि स्पेन यांच्यात पुरुष आणि महिलांचे सामने खेळविले जाणार आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघ आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करेल तर भारतीय महिला संघ आपली विजयी घोडदौड राखण्यासाठी लढत देईल.
भारत आणि स्पेन महिला गटातील सामना शनिवारी सायंकाळी पाच वाजता सुरु होईल तर भारत आणि स्पेन पुरुष गटातील सामन्याला शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता प्रारंभ होईल. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक मिळविणाऱया भारतीय पुरुष हॉकी संघाने प्रो-लीग हॉकी स्पर्धेतील आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ करताना पहिल्या सामन्यात फ्रान्सचा 5-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. दरम्यान उभय संघातील झालेल्या परतीच्या सामन्यात फ्रान्सने भारताचा 5-2 असा पराभव केला होता. या स्पर्धेतील दक्षिण ऑफ्रिका संघाविरुद्धच्या दोन सामन्यामध्ये भारताने 10-2 अशा गोलफरकाने मोठे विजय नोंदविले होते. शनिवारच्या स्पेनविरुद्धच्या सामन्यात भारतीय पुरुष संघ आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्न करेल. हरमनप्रितसिंगच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या बचाव फळीला चांगली कामगिरी करावी लागेल. त्याचप्रमाणे पेनल्टी कॉर्नरचा लाभ अचूकपणे घेणे जरुरीचे आहे. प्रो लीगमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांत स्पेनला 1-6 आणि 2-3 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यांना आता सुधारित कामगिरी करण्यावर भर द्यावा लागेल.
प्रो-लीग हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत विजयी घोडदौड राखली आहे. शनिवारच्या स्पेनविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघ पुन्हा मोठय़ा फरकाने विजय मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेतील मस्कतमध्ये झालेल्या सलामीच्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने चीनचा 7-1 तर दुसऱया सामन्यात 2-1 असा पराभव केला. 2022 च्या हॉकी हंगामामध्ये बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत असल्याने प्रो-लीग स्पर्धा महत्त्वाची असून भारताला अव्वल संघांबरोबर खेळण्याची संधी उपलब्ध झाल्याचे कर्णधार सविताने म्हटले आहे.
आगामी विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीकोनातूनही प्रो-लीग स्पर्धा प्रत्येक संघाला महत्त्वाची ठरणार आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत चौथे स्थान मिळविणाऱया भारतीय महिला हॉकी संघाला सांघिक मानांकनात सातव्या स्थानावर असलेल्या स्पेनविरुद्ध जागरुक रहावे लागेल. प्रो-लीग स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारतीय महिला संघाने दोन सामन्यातून आतापर्यंत 6 गुण मिळविले आहेत.