भालाफेकपटू सुमित अंतिलने जिंकले दुसरे सुवर्ण
टोकियो / वृत्तसंस्था
भालाफेकपटू सुमित अंतिलने सध्या सुरु असलेल्या टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताला दुसरे सुवर्ण जिंकून दिले. सुमितने यावेळी पुरुषांच्या एफ 64 कॅटेगरीत नव्या विश्वविक्रमासह अव्वलस्थान संपादन केले.
हरियाणातील सोनेपत येथील रहिवासी असलेल्या सुमितला 2015 मध्ये मोटरबाईक अपघातात डावा पाय गमवावा लागला होता. सोमवारी त्याने येथे आपल्या पाचव्या प्रयत्नात 68.55 मीटर्सचा थ्रो करत सुवर्ण जिंकले. हा त्याचा नवा विश्वविक्रमही आहे. येथे त्याने 62.88 मीटर्सचा मागील विश्वविक्रम मोडीत काढला. हा विक्रम देखील त्याच्या खात्यावरच होता. फायनलमध्ये त्याचा शेवटचा थ्रो फाऊल झाला. त्याने सिरीजमध्ये 66.95, 68.08, 65.27, 66.71, 68.55 व फाऊल अशी कामगिरी नोंदवताना पाचवेळा विश्वविक्रम मागे टाकला.
ऑस्ट्रेलियाचा मायकल ब्युरियन (66.29 मी.) व श्रीलंकेचा डय़ूलन कोडिथुवक्कू (65.61 मी.) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदके जिंकली. एफ-64 ही कॅटेगरी कृत्रिम पाय बसवलेल्या ऍथलिटसाठी असते. उभ्या जागेवरुन ते थ्रो करतात.
कधी काळी नीरजविरुद्ध लढला होता सुमित अंतिल!
दिल्लीत महाविद्यालयीन शिक्षण घेणारा सुमित अंतिल अपघात होण्यापूर्वी कुस्तीत नशीब आजमावत होता. मात्र, अपघातानंतर गुडघ्याखालून पाय काढावा लागल्यानंतर त्याची जगण्याची दिशाच बदलून गेली. हरियाणात त्याच्या खेडय़ातील एक पॅरा ऍथलिटमुळे सुमितला 2018 मध्ये भालाफेकीकडे वळता आले. आश्चर्य म्हणजे 5 मार्च रोजी इंडियन ग्रां प्रि सिरीज 3 मध्ये सुमित अंतिल नीरज चोप्राविरुद्धही लढला आहे. त्या इव्हेंटमध्ये सर्व गटातील प्रतिस्पर्धी समाविष्ट होते.
देवेंद्र झाझरिया रौप्यपदकाचा मानकरी, गुर्जरला कांस्य
दोन वेळचा सुवर्णजेता भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया यंदा रौप्यपदकाचा मानकरी ठरला. पॅरालिम्पिक्समध्ये त्याचे हे आजवरचे एकूण तिसरे पदक ठरले. यापूर्वी 2004 व 2016 पॅरालिम्पिक्समध्ये तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. येथे देवेंद्रने 64.35 मीटर्सची वैयक्तिक कारकिर्दीतील सर्वोत्तम फेक करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
देवेंद्र झाझरियाला वयाच्या आठव्या वर्षी झाडावर चढलेला असताना विद्युतधारेला स्पर्श झाल्याने डावा हात गमवावा लागला होता. सोमवारी त्याने 63.97 मीटर्सचा आपला मागील विक्रम मोडीत काढला. मात्र, येथे लंकेचा दिनेश प्रियन हेराथ मुदियन्सेलगे त्याच्यापेक्षा सरस ठरला. दिनेशने 67.79 मीटर्सचा दमदार थ्रो करत सुवर्ण जिंकले.
याच इव्हेंटमध्ये 25 वर्षीय सुंदर सिंग गुर्जरने झाझरियापाठोपाठ कांस्यपदकाची कमाई केली. यासह भारताची पदकसंख्या सातवर पोहोचली. यापूर्वी रिओ पॅरालिम्पिक्समध्ये भारताने 4 पदके जिंकली होती.
राजस्थानमधील कराऊली जिल्हय़ात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुंदर सिंगने यापूर्वी 2017 व 2019 वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण तर 2018 जकार्ता पॅरा आशियाई गेम्समध्ये रौप्य जिंकले आहे. सध्या तो जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर सराव करतो. एकदा मित्राच्या घरी मेटल शीट पडल्याने त्याला डावा हात गमवावा लागला होता.
कोट्स
देवेंद्र भाई साहब! आम्हा सर्वांसाठी तू खराखुरा प्रेरणास्थान आहे. पॅरालिम्पिक्समधील विक्रमी तिसऱया पदकाबद्दल खास अभिनंदन. सुंदर भाईचेही कांस्य पदकाबद्दल अभिनंदन.
-ऑलिम्पिक सुवर्णजेता नीरज चोप्रा
पुरुषांच्या थाळीफेकीत योगेश कथुनियाला रौप्यपदक
थाळीफेकपटू योगेश कथुनियाने पुरुषांच्या एफ 56 थाळीफेक इव्हेंटमध्ये रौप्य जिंकल्यानंतर भारताने सोमवारी आणखी धवल यश प्राप्त केले. नवी दिल्लीतील किरोरीमल कॉलेजमधून वाणिज्य पदवी संपादन करणाऱया 24 वर्षीय योगेशने आपल्या सहाव्या व शेवटच्या प्रयत्नात 44.38 मीटर्सचा थ्रो करत दुसरे स्थान प्राप्त केले.
योगेशचे वडील लष्करी सेवेत असल्याने योगेशला शिस्तीचे धडे असणे साहजिक होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याला पॅरालिसिसचा झटका आला होता. ब्राझीलचा विद्यमान चॅम्पियन, विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन व विश्वविक्रमधारक क्लॉडनी बॅतिस्टा डॉस सॅन्टोसने 45.59 मीटर्सचा थ्रो करत सुवर्ण जिंकले तर क्युबाच्या लिओनार्डोने दियाझ ऍल्दानाने 43.36 मीटर्स थ्रोसह कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली.
योगेशने यापूर्वी 2019 वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले होते. दुबईत संपन्न झालेल्या त्या स्पर्धेत त्याने 42.51 मीटर्सचा थ्रो केला आणि तेथेच टोकियो पॅरालिम्पिक्समधील त्याचे स्थानही निश्चित झाले होते. 2018 मध्ये बर्लिन पॅराöऍथलेटिक्स ग्रां प्रि मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पणात त्याने एफ 36 कॅटेगरीत विश्वविक्रम प्रस्थापित केला होता.
अपात्रतेमुळे थाळीफेकपटू विनोद कुमारने कांस्य गमावले
एफ 52 कॅटेगरीत कांस्य जिंकलेल्या थाळीफेकपटू विनोद कुमारला अपात्र ठरवले गेल्याने त्याला कांस्यपदक गमवावे लागले. यापूर्वी रविवारी तो 19.91 मीटर्स फेकीसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. मात्र, प्रतिस्पर्धी पॅरा-ऍथलिटनी कॉम्पिटिशन पॅनेलकडे डिसॅबलिटी क्लासिफिकेशनबद्दल आक्षेप घेतल्यानंतर नव्याने चाचपणी केली गेली आणि त्यानंतर त्याला अपात्र ठरवले गेले.
सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या 41 वर्षीय विनोद कुमारने रविवारी झालेल्या फायनलमध्ये तिसरे स्थान मिळवले होते. या इव्हेंटमध्ये पोलंडचा पिओत्र कोसेविझ (20.02 मी.) व क्रोएशियाचा व्हेलिमिर सॅन्दोर (19.98 मी.) अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाचे मानकरी ठरले होते.
पॅरा-ऍथलिट्सचे क्लासिफिकेशन त्यांच्या डिसेबलिटीचा प्रकार व तीव्रता यावर अवलंबून असते. विनोद कुमारचे क्लासिफिकेशन 22 ऑगस्ट रोजी झाले होते. मात्र, तो क्लासिफिकेशन नॉट कम्पिटेड (सीएनसी) डेसिग्नेटेट नसल्याचा आक्षेप त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी घेतला आणि त्यानुसार, हा निर्णय घेतला गेला.
कोट्स
आपल्या पॅरालिम्पियन्सनी मिळवलेले यश अवघ्या देशवासियांमध्ये आनंदाची लहर उमटवणारे आहे. अवनीसह सर्व जेत्यांमुळे भारत पुन्हा एकदा पोडियमवर पोहोचला. या सर्वांचे मनापासून अभिनंदन.
-राष्ट्रपती रामनाथ कोविंद
भारतीय क्रीडा वर्तुळासाठी आजचा दिवस खास आहे. अवनी लेखरा, सुमित, सुंदर, देवेंद्र, योगेश कथुनिया या सर्वांचे खास अभिनंदन.
-पंतप्रधान नरेंद्र मोदी
ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्ण जिंकणारी आजवरची पहिली भारतीय महिला क्रीडापटू अवनी लेखराचे खास अभिनंदन. आम्हा सर्वांना या कामगिरीचा अभिमान आहे.
-क्रीडामंत्री अनुराग ठाकुर
अवनी लेखरा, सुमितसह सर्व पदकजेत्यांचे खास अभिनंदन. आपल्या सर्वांच्या या अव्वल कामगिरीचा अवघ्या देशवासियांना अभिमान आहे.
-काँग्रेस नेते राहुल गांधी