प्रतिनिधी / ओटवणे:
भालावल गावात आठवडाभरात पाच मृत माकडे आढळल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्यावर्षी या गावात माकडतापाचे अनेक रुग्ण आढळले तर एका महिलेचा यात मृत्यू झाल्याने आरोग्य व वनखात्याने याची तात्काळ दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी भालावल ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
गेल्यावर्षी याच दरम्यान गावात अनेक माकडे मृत पावली होती. त्यानंतर गावातील ग्रामस्थांसह महिलांसह माकडतापाची लागण झाली होती. त्यावेळी आरोग्य व वनखात्याने याची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करीत गावातील माकडताप आटोक्यात आणला होता. आता यावर्षीही गावात मृत माकडे आढळत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे गावात माकडताप प्रतिबंध उपाययोजना आरोग्य व वनखात्याने राबवावी. गावावरील संभाव्य माकडतापाचे संकट दूर करावे, अशी भालावल ग्रामस्थांची मागणी आहे.