वार्ताहर/ माखजन
पुणे-कोथरुड येथील विजयालक्ष्मी अपार्टमेंट रामबाग कॉलनी शिवराय प्रतिष्ठान कॉलेजसमोर राहणाऱया भाविका विलास झोरे (34) हिचा सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूला पती जबाबदार असून तिचा पती विलास तुकाराम झोरे यांच्यावर भाविका झोरेच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे तर समाजातील पदाधिकाऱयांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेत संगमेश्वरची माहेरवाशीण असलेल्या भाविका झोरे हिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पती व इतर आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी विनंती केली. यावेळी निकम यांनी आपल्या संगमेश्वर तालुक्यातील बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे.
भाविका झोरे हिच्या आईने कोथरुड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी भा.दं.वि 306, 323, 504 अन्वये गुन्हा दाखल केला असला तरी भाविका झोरे हिला मारहाण केली गेल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या पतीवर भा.दं.वि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी समाजातून होत आहे. कोथरुड पोलिसांची सुरुवातीला तपासाची गती धिम्यागतीने सुरु होती. समाजातील पदाधिकाऱयांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कोथरूड पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करावी, या मागणीला जोर धरत आहे.
भाविका पिंगळे ही मूळची संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथील रहिवासी असून तिचा 12 डिसेंबर 2010 रोजी विलास तुकाराम झोरे यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह करण्यात आला होता. लग्नानंतर फक्त 6 महिने संसार सुखी केल्यानंतर पतीकडून वारंवार अपमानास्पद वागणूक देण्याची सुरुवात झाली. भाविका व विलास यांना तीन मुले आहेत. भाविकाच्या आईने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, 2011 पासून भाविका हिचा कायम छळ होत होता. तिचा वारंवार मानसिक छळ करण्यात येत होता. छळाबाबत भाविका हिने आईला फोनवरुन सांगितले होते, मात्र तिने या छळाबाबत घरच्या इतरांना न सांगण्याची अट घातल्याने आईने तिच्या भावांना याबद्दल काही सांगितले नव्हते. भाविका हिचा पती सुधारेल आणि त्यांचा संसार सुखाचा होईल, या आशेवर तिची आई होती, मात्र भाविकाच्या छळात वाढच होत गेली. भाविकाला जेवण जमत नाही, काही काम नको, असे वारंवार हिणवले जात असल्याचे आईने सांगितले. भाविका वर्षातून एकदा दिवाळी सणात माहेरी येत असे. ती माहेरी आली म्हणून देखील तिचा छळ केल्याचे आई सांगितले.
19 डिसेंबर 2020 ला भाविका बहिणीची मुलगी मयुरी हिच्या लग्नासाठी देवरुख-रत्नागिरी येथे आली होती त्या दरम्यान तिचा छळ झाला मुलांचे कारण देत पतीकडून शिवीगाळ करण्यात आली होती. पतीने त्या लग्नातच भाविकाला लग्न सोडून पुण्याला जाण्याची धमकी दिली होती. मात्र माहेरच्या मंडळींनी समजूत घालत प्रकरण शांत केले होते. मात्र ही शांतता फार काळ टिकू शकली नाही. खूप दिवसांच्या छळवणुकीनंतर अखेर भाविकाचा 3 फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. भाविकावर कोथरुड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे.