पदक जिंकणारी पहिली भारतीय टेटेपटू
वृत्तसंस्था/ टोकियो
भारताची पॅरा टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक निश्चित करत पहिली भारतीय होण्याचा मान मिळविला. तिने महिला एकेरी क्लास 4 कॅटेगरीत सर्बियाच्या विद्यमान विजेत्या बोरिस्लावा पेरिक रॅनकोविचला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली.
34 वर्षीय भाविनाबेनने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱया रॅनकोविचवर 11-5, 11-6, 11-7 अशी सहज मात केली. हा सामना तिने केवळ 18 मिनिटांत संपवला. उपांत्य फेरीत तिची लढत चीनच्या झांग मियावविरुद्ध होणार आहे. टोकियो पॅरालिम्पिक टेबल टेनिसमध्ये कांस्यपदकाची लढत होणार नसून उपांत्य फेरीत पराभूत होणाऱया दोन्ही खेळाडूंना कांस्यपदक दिले जाते. त्यामुळे भाविनाबेनचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे, असे म्हणता येईल. ‘तिच्याकडून पदक मिळणार हे आता निश्चित झाले आहे. तिच्या पदकाचा रंग कोणता असणार हे शनिवारी सकाळीच कळणार आहे,’ असे भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी सोशल मीडियात पोस्ट केलेल्य व्हिडिओत म्हटले आहे.
2017 मध्ये आयटीटीएफने पॅरालिम्पिक्समध्ये कांस्यपदकाची प्लेऑफ लढत रद्द करून उपांत्य फेरीत पराभूत होणाऱया दोन्ही खेळाडूंना कांस्य देण्याची विनंती केली होती, त्याला आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने मंजुरी दिली होती.
त्याआधी शुक्रवारच्या शेवटच्या सोळा फेरीतील सामन्यात भाविनाबेनने ब्राझीलच्या जॉयसी डी ओलिव्हिएराचा 12-10, 13-11, 11-6 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठत पॅरालिम्पिक्समध्ये हा टप्पा गाठणारी पहिली भारतीय टेटेपटू बनली होती. क्लास 4 कॅटेगरीतील खेळाडूंना व्यवस्थित तोल सावरत बसता येते आणि हातांच्या मुक्त हालचाली ते करू शकतात. मात्र पायाने ते अधू असतात.
‘भारतीयांचा मला भरघोस पाठिंबा मिळत असल्याने उपांत्य फेरीची लढत मी जिंकून शकेन असा मला विश्वास वाटतो. या विजयासाठी मला तुमच्या प्रोत्साहनाची मला गरज आहे,’ असे भाविनाबेन हा सामना झाल्यानंतर म्हणाली. साखळी फेरीत तिने एक सामना गमविला व एक जिंकला होता. या कामगिरीवर तिने बाद फेरी गाठली होती. तिचीच सहकारी सोनलबेन पटेलला मात्र साखळी फेरीतील दोन्ही सामने गमवावे लागल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले होते.
सकिना खातुन पाचवी
भारताची पॅरा पॉवरलिफ्टर सकिना खातुनने महिलांच्या 50 किलो गटात पाचवे स्थान मिळविले तर पुरुषांच्या 65 किलो गटात जयदीपला मात्र तीनपैकी एकाही प्रयत्नात अधिकृतपणे वजन उचलता आले नाही. 2014 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य जिंकलेल्या खातुनने 93 किलो वजन उचलण्याची सर्वोत्तम कामगिरी केली. पण पदक जिंकून देण्यास ती पुरेशी ठरली नाही. चीनच्या दंडन हु हिने 120 किलो वजन उचलत सुवर्ण, इजिप्तच्या रेहाब अहमदनेही 120 किलो वजन उचलत रौप्य व ग्रेट ब्रिटनच्या ऑलिव्हिया ब्रूमने (107 किलो) कांस्यपदक मिळविले. सकिनाने पहिल्या प्रयत्नात 90, दुसऱया प्रयत्नात 93 किलो वजन उचलले मात्र ती अपयशी ठरली. तिसऱया प्रयत्नात ती 93 किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरली. 2014 राष्ट्रकुलमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला पॅरालिम्पियन बनली होती. याशिवाय तिने 2018 पॅराआशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे.
पुरुष विभागात जयदीपला तीनही प्रयत्नात वजन उचलण्यात यश आले नाही. 31 वर्षीय जयदीप पहिल्या दोन प्रयत्नात 160 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरला. तिसऱया वेळी 167 किलो वजन उचलण्याचा त्याचा प्रयत्नही अयशस्वी ठरला. चीनच्या लियू लेईने (198 किलो) सुवर्ण व इराणच्या जाफरी अरानगेह आमिरने (195 किलो) रौप्य जिंकले तर अल्जेरियाच्या बेटिर होसिनेने (192) कांस्य मिळविले. पॉवरलिफ्टिंगमध्ये खेळाडू शरीराने मजबूत असतात, पण पाय किंवा कंबरेच्या भागात दोष असतो. त्यामुळे त्यांना पॅरा स्पर्धेतच खेळावे लागते.