टोकियो पॅरालिम्पिक टेटे : ब्रिटनच्या शॅकलटनवर मात, ऍथलेटिक्समध्ये भारताला पदकाच्या आशा
वृत्तसंस्था /टोकियो
भारताची प्रमुख पॅराटेबलटेनिसपटू भाविनाबेन पटेलने पॅरालिम्पिक्समध्ये महिलांच्या क्लास 4 टेटे एकेरीची बाद फेरी गाठताना ग्रेट ब्रिटनच्या मेगन शॅकलटनवर 3-1 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
34 वर्षीय भाविनाबेनने जागतिक नवव्या मानांकित शॅकलटनवर 11-7, 9-11, 17-15, 13-11 अशी 41 मिनिटांच्या खेळात मात करीत शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले. जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असणाऱया भाविनाबेनला हा सामना जिंकणे आवश्यक होते. तिने प्रारंभापासूनच सामन्यावर वर्चस्व राखण्यास सुरुवात केली. पहिला गेम तिने केवळ 8 मिनिटांत संपवला. शॅकलटननेही दुसऱया गेममध्ये जोरदार प्रतिकार केला आणि गेम जिंकत भाविनाबेनशी बरोबरी साधली. नंतरच्या दोन गेम्समध्ये मात्र दोघींत जबरदस्त चुरस पहावयास मिळाली. चौथ्या गेममध्ये तर 11-11 पर्यंत दोघींचा तोडीस तोड खेळ झाला. मात्र अखेरीस भाविनाबेननेच 13-11 अशी बाजी मारत आगेकूच केली.
‘यापुढील सामन्यांत मला याहून सरस कामगिरी करावी लागेल. आज मी संयम राखत चेंडूवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करताना नकारात्मक विचारांनी विचलित होणार नाही, याची दक्षता घेतली. ही लढत अतिशय चुरशीची झाली यात शंकाच नाही. प्रत्येक गुणासाठी दोघींमध्ये संघर्ष झाला. पण मी हार मानली नाही. एक अवघड सामना जिंकल्याचा मला खूप आनंद वाटतो,’ अशा भावना भाविनाबेनने नंतर व्यक्त केल्या.
तिचा हा या स्पर्धेतील पहिला विजय होता. याआधी पहिल्या सामन्यात तिला चीनच्या झोयू यिंगकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. भाविनाबेनने दोन सामन्यांतून 3 गुण मिळवित बाद फेरी गाठली असून चीनची यिंग गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे. सोनलबेन पटेललाही पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला तर तिचा दुसरा सामना दक्षिण कोरियाच्या मि जीयू ली हिच्याशी होणार आहे.
ऍथलेटिक्स क्रीडाप्रकार आजपासून
ऍथलेटिक्स पथकात भारताचे पदकाचे दावेदार असलेले खेळाडू असून शुक्रवारपासून या प्रकाराला सुरुवात होत असल्याने भारताला पदकाची आशा करता येईल. 24 सदस्यांचे स्ट्राँग पथक भारताने या स्पर्धेत पाठविले असून त्यात मागील पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्ण जिंकलेला थंगवेलू मरियप्पन याचा समावेश आहे. मरियप्पनने पुरुषांच्या टी 42 कॅटेगरी उंच उडीत त्याने हे पदक रिओमध्ये जिंकले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी ध्वजधारक म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. पण एका कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याच्याऐवजी तेक चंदने ही भूमिका पार पाडली होती. आयोजन समितीने थंगवेलूला खेळण्याची परवानगी दिली आहे.
त्याच्याशिवाय देवेंद्र झाझरिया हा भालाफेकपटू एफ 46 कॅटेगरीत भाग घेत आहे. तो विद्यमान विश्वविक्रमधारक असून पॅरालिम्पिक्समध्ये दोन सुवर्ण मिळविणारा भारताचा तो एकमेव पॅराऍथलिट आहे. भारताचे एकूण आठ भालाफेकपटू यात सहभागी झाले असून सर्वजण जागतिक मानांकनात चांगल्या स्थानावर आहेत. पदक पटकावणे हेच या सर्वांचे मुख्य ध्येय आहे. यात संदीप चौधरी, सुमित अँटिल, सुंदर सिंग गुर्जर, अजीत सिंग यादव, नवदीप व रणजीत भाटी यांचा समावेश आहे.
उंच उडीमध्ये रिओ कांस्यविजेता वरुण सिंग भाटी, जागतिक द्वितीय मानांकित शरद कुमार, तिसरा मानांकित प्रवीण कुमार, निशाद कुमार, राम पाल चहर यांचाही समावेश आहे. तसेच गोळाफेकमध्ये सोमण राणा व थाळीफेकमध्ये योगेश कथुनिया यांच्याकडून लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा आहे.