केएल राहुल-रिषभ पंत एकमेकांविरोधात दंड थोपटण्यासाठी सज्ज
मुंबई / वृत्तसंस्था
केएल राहुल व रिषभ पंत हे अनुक्रमे लखनौ सुपरजायंट्स व दिल्ली कॅपिटल्सचे युवा शिलेदार आज (गुरुवार दि. 7) होणाऱया आयपीएल साखळी सामन्यात एकमेकांविरोधात दंड थोपटणार आहेत. फलंदाजीच्या आघाडीवर मॅचविनर म्हणून नावारुपास आलेले हे दोन्ही दिग्गज या निमित्ताने नेतृत्वातील आपली ब्रँड व्हॅल्यू अधोरेखित करण्यासाठी देखील विशेष महत्त्वाकांक्षी असतील. ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
आयपीएलच्या सर्वोच्च व्यासपीठावर दडपण हाताळत खेळण्याचा मिळणारा अनुभव प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक कर्णधारासाठी महत्त्वाचा असतो आणि आपले नेतृत्व कौशल्य आणखी परजण्यासाठी केएल राहुल व पंत आज उत्सुक असतील, हे स्पष्ट आहे.
भारतीय संघ पुढील काही वर्षात भरगच्च क्रिकेट खेळणार असून राष्ट्रीय संघाचा कर्णधार रोहित शर्मावरील वर्कलोड मॅनेजमेंट विशेष महत्त्वाचे असेल. त्या पार्श्वभूमीवर, राहुल व पंत भविष्यात आपल्याकडे भावी कर्णधार म्हणून पाहिले जावे, यासाठी अनुभव पणाला लावत असतील तर यात आश्चर्याचे कारण नाही. आजच्या लढतीत वॉर्नर उपलब्ध असल्याने दिल्ली कॅपिटल्सचे मनोबल उंचावलेले असू शकते. वॉर्नरला अंतिम एकादशमध्ये खेळवण्याचा निर्णय झाल्यास टीम सेफर्टला बाहेर व्हावे लागू शकते. अष्टपैलू स्टोईनिसला टाय किंवा इव्हिन लुईस यांच्या जागी स्थान मिळू शकते.
दोन्ही संघांसमोर गोलंदाजीत अनेक चिंता आहेत. मात्र, गौतम गंभीर मेन्टर असलेल्या लखनौने ही बाब आतापर्यंत तरी व्यवस्थित हाताळली आहे. जेसॉन होल्डरचा समावेश केल्याने लखनौचा संघ अधिक मजबूत झाला असून पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर ही जोडी प्रतिस्पर्धी गोलंदाजीवर तुटून पडण्याची या प्रँचायझीला अपेक्षा असेल.
प्रतिस्पर्धी संघ
लखनौ सुपरजायंट्स ः केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, इव्हिन लुईस, मनीष पांडे, क्विन्टॉन डी कॉक, रवि बिश्नोई, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान, मयांक यादव, अंकित रजपूत, अवेश खान, ऍन्डय़्रू टाय, मार्कस स्टोईनिस, काईल मेयर्स, कर्ण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, जेसॉन होल्डर.
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बार, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, रोव्हमन पॉवेल, ऍनरिच नोर्त्झे, चेतन साकरिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजूर रहमान, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सर्फराज खान, विकी ओस्तवल, यश धुल, केएस भरत, टीम सेफर्ट.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
बॉक्स
लखनौला कर्णधार केएल राहुलकडून फटकेबाजीची अपेक्षा
कर्णधार केएल राहुलने यापूर्वी चेन्नई व सनरायजर्स हैदराबादविरुद्ध दमदार डाव साकारले असून क्विन्टॉन डी कॉकने चेन्नईविरुद्ध लढतीची पुनरावृत्ती करावी, अशी लखनौ फ्रँचायझीची अपेक्षा असेल. मार्क वूड उपलब्ध नसल्याने त्यांच्या गोलंदाजांवर मात्र त्या तुलनेत बरेच दडपण असणार आहे. वॉर्नर-पंत-पृथ्वी शॉ यांच्यासारखे आघाडीचे फलंदाज मोठी खेळी साकारण्यासाठी महत्त्वाकांक्षी असल्याने त्यांना रोखणे लखनौसाठी आव्हानात्मक असेल. दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई व ऍन्डय़्रू टाय यांच्यावर बरीच जबाबदारी असू शकते.
मनीष पांडे अतिशय खराब फॉर्ममध्ये आहे. मात्र, गौतम गंभीर हा त्याच्या खेळाडूंना शक्य तितकी संधी देणारा मार्गदर्शक म्हणून ओळखला जात असल्याने मनीष पांडेवर इतक्यात टांगती तलवार नसेल, असा होरा आहे. मात्र, पांडेला वगळण्याचा निर्णय झाला तर त्याच्याऐवजी कोना भरत, सर्फराज व यश धुल यांच्यापैकी एका खेळाडूचा विचार होऊ शकतो, असे संकेत आहेत. लखनौची बेंच स्ट्रेंथ साधारण स्वरुपाची राहिली असून यातील मनन वोहरा अगदी आयपीएलमध्येही प्रभावी ठरु शकलेला नाही तर उत्तर प्रदेशचा कर्ण शर्मा हा अद्याप फिनिश्ड प्रोडक्ट बनलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.