आंध्रप्रदेशच्या कुटुंबाने वाढले 365 प्रकारचे खाद्यपदार्थ
भारत हा परंपरा आणि रीति-रिवाजांचा देश आहे. वैविध्यपूर्ण असलेला भारत हा संस्कारांचा प्रतीक आहे. देशाच्या कानाकोपऱयात विविध प्रकारच्या प्रथा, परंपरांचे पालन केले जाते. एक अशीच परंपरा आंध्रप्रदेशच्या गोदावरी जिल्हय़ात पाळली जाते. येथील नरसापुरममधील एका आंध्र कुटुंबाने मकर संक्रांती सणावेळी रविवारी स्वतःच्या होणाऱया जावयाला 365 प्रकारचे खाद्यपदार्थ जेवणात वाढले आहेत.
या कुटुंबाने भावी जावयाला एकप्रकारे शाही भोजनच वाढले असून यात 365 प्रकारचे खाद्यपदार्थ सामील होते. होणाऱया जावयाबद्दल प्रेम दर्शविण्यासाठी वर्षातील 365 दिवस विचारात घेत 365 प्रकारच्या खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती असे एका कुटुंबीयाने सांगितले आहे. हे जोडपे लवकरच विवाहबद्ध होणार आहे.
तुम्मलपल्ली सुब्रह्मण्यम आणि अन्नपूर्णा हे स्वतःचा पुत्र साईकृष्ण याचा विवाह सुवर्णकार अत्यम वेंकटेश्वर राव आणि माधवी यांची कन्या कुंदवीसोबत करणार आहेत. विवाहापूर्वी मकर संक्राती सणावेळी वधूचे आजोबा आणि आजींनी भावी जावयासाठी मेजवानीची व्यवस्था केली. या भव्य प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये वधू आणि वर दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी भाग घेतला आहे. या लोकांनी मिळून या सेलिब्रेशनला अधिकच मोठे स्वरुप दिले.
या मेजवानीत विविध प्रकारच्या 30 करी, भात, पारंपरिक गोदावरी मिठाई, पीलहोरा, बिर्याणी, शीतपेये, बिस्किट्स, फळे, केक इत्यादी तयार करण्यात आले होते. ही मेजवानी आता पूर्व आणि पश्चिम गोदावरी या दोन्ही जिल्हय़ांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. गोदावरीचे दोन्ही जिल्हे तसेचही स्वतःच्या उत्साहपूर्ण आतिथ्यासाठी ओळखले जातात.