मालवण/प्रतिनिधी –
बॅ नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर च्यावतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या दादा शिखरे सभागृहात सुप्रसिद्ध मालवणी कवि श्री. दादा मडकईकर आणि श्री. रुजारिओ पिंटो यांच्या बहारदार मालवणी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दादा मडकईकर यांनी त्यांच्या शैलीत अनेक कविता सादर केल्या.दादांनी आपल्या गात्या गळ्याने साध्या साध्या प्रसंगातून सुचलेल्या कविता गाजलेल्या व लोकप्रिय गीतांच्या चालीत कशा बसविल्या ते उलगडून सांगितले. खेडेगाव,जत्रा, पाठ्यपुस्तकातील कविता सादर केल्या.रसिक श्रोत्यांनी हशा, टाळ्यांच्या स्वरुपात भरभरून प्रतिसाद दिला.श्री. रुजारिओ पिंटो यांनी आपल्या कवितांमधून कोकणातला निसर्ग, प्रासंगिक राजकिय विडंबनात्मक प्रेमकविता सादर केल्या.स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर कविता सादर केली.फातर ही पुरस्कार विजेती स्त्रीची व्यथा मांडणारी कोंकणी कविता रसिकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली.