प्रतिनिधी/ बेळगाव
वादळी वारा व अवेळी पावसाने शेतवडीतील एका शेडची भिंत कोसळून बकरी चारण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
कल्लाप्पा सिद्धाप्पा सांबरेकर (वय 40) रा. कोंडसकोप्प व त्याचा भाचा परशुराम गंगाप्पा शहापूरकर (वय 14) रा. शिंदोळी अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मामा-भाच्याची नावे आहेत. के. के. कोप्पजवळील वारी शेतवाडीत ही घटना घडली असून घटनास्थळी परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती.
के. के. कोप्प, हलगा-बस्तवाड, कोंडसकोप्प परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. हिरेबागेवाडी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक नागराज अंबिगेर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कल्लाप्पा व परशुराम हे दोघे मामा-भाचे के. के. कोप्प वारी शेतवाडी परिसरात बकऱया चारण्यासाठी गेले होते. अचानक वादळी वाऱयासह पावसाला सुरुवात झाली म्हणून शेतवाडीतील एका शेडमध्ये आडोशाला थांबले होते. वाऱयाने त्या शेडवरील पत्रे उडून गेले व शेडची भिंत या दोघांच्या अंगावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कल्लाप्पाची बकरी चरत पुढे गेली. केवळ बकरीच आहेत, मात्र मेंढपाळ का दिसत नाही, अशा संशयाने काही जणांनी या परिसरात पाहिले असता शेडची भिंत कोसळल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. दुर्घटनेत मामा-भाच्याचा मृत्यू झाल्यामुळे कोंडसकोप्प, शिंदोळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.