काँग्रेस उमेदवार धनीलाल अजब प्रकारे मागत आहेत समर्थन
मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने मतदारांना स्वतःच्या बाजूने आकर्षित करण्यासाठी नेते एकाहून एक अजब कृत्य करू लागले आहेत. उत्तराखंडच्या टिहरी गढवाल जिल्हय़ातून नवी घटना समोर आली आहे. येथील काँग्रेस उमेदवार स्वतःला भिकारी समजून मत देण्यात यावे असे सांगून लोकांना मतदानाचे आवाहन करत आहे. उमेदवाराची मत मागण्याची ही पद्धत पूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
टिहरी गढवाल येथील घनसाली विधानसभा मतदारसंघात उभे राहिलेले काँग्रेस उमेदवार धनीलाल शाह अशाचप्रकारे मतदारसंघात मते मागत आहेत. भिकेच्या स्वरुपात मत मागणारे धनीलाल मतदारांशी संवाद साधत आहेत. घरोघरी जाऊन यंदा तुम्ही मला विधानसभेत अवश्य पाठवाल असा विश्वास असल्याचे लोकांना सांगत आहेत. जर तुम्ही मला मत नाही दिले तर माझ्या पराभवानंतर माझ्या चितेवर एक लाकूड अवश्य ठेवा असेही ते लोकांना उद्देशून म्हणत आहेत.
70 सदस्यीय उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी संपतोय. राज्यात काँग्रेस, भाजपसह आम आदमी पक्ष, बसप आणि अनेक छोटे पक्ष स्वतःचे भवितव्य आजमावून पाहत आहेत. परंतु भाजपसाठी उत्तराखंड सर्वात आव्हानात्मक ठरले आहे. कारण येथे 2 दशकांपासून दर 5 वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा चालत आली आहे. अशा स्थितीत आपण सत्तेवर परतू असा विश्वास काँग्रेसला वाटतोय.
भाजप उत्तराखंडमधील सत्तांतराचे मिथक तोडण्यास प्रयत्नशील आहे. उत्तराखंडमध्ये मागील निवडणुकीत भाजपने 57 जागा जिंकून प्रचंड बहुमतासह सरकार स्थापन केले होते. तर काँग्रेसला केवळ 11 जागाच मिळू शकल्या होत्या. तेव्हा त्रिवेंद्र सिंह रावत मुख्यमंत्री झाले होते. परंतु 4 वर्षांनी त्यांना हटवून भाजपने तीर्थसिंह रावत यांना सत्तेची धुरा सोपविली. परंतु काही महिन्यांमध्येच तीर्थसिंह यांच्याजागी पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री करण्यात आले.