कर्नाटकातील बळ्ळारी जिल्हय़ात एका भिकाऱयाच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोकांनी गर्दी केल्याची अनोखी घटना नुकतीच घडली आहे. हा भिकारी ‘हुच्च बसय्या’ या नावाने ओळखला जात होता. तो डोक्याने थोर अधू असल्याचे बोलले जात होते. त्याचे वैशिष्टय़ असे, की तो कोणाकडूनही एक रुपयापेक्षा अधिक रकमेची भीक स्वीकारत नसे. त्याच्या या सवयीमुळे तो बळ्ळारी भागात प्रसिद्धीस पावलेला होता. विशेषतः हदगली शहरात तो जवळपास सर्वांच्या परिचयाचा होता. त्याला भिक्षा दिल्यास आपले नशीब फळफळेल, असा विश्वास अनेकांना होता.
त्याच्या या ख्यातीमुळे त्याचा मृत्यू झाल्यानंतर हजारो लोकांनी त्याचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्याला श्रद्धांजली देणारी पोस्टर्स शहरात सर्वत्र लावण्यात आली होती. त्याच्या मृतदेहाची मिरवणूक काढण्यात येऊन एखाद्या महनीय व्यक्तीला साजेसा निरोप त्याला देण्यात आला. त्याला कोणी एक रुपयाहून अधिक भीक दिली तर तो उरलेले पैसे त्या व्यक्तीस परत देत असे. लोकांनी सक्ती केली तरी तो एक रुपयापेक्षा अधिक रक्कम स्वीकारत नसे. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री एम. पी. प्रकाश तसेच माजी मंत्री परमेश्वर नाईक इत्यादी मान्यवर त्याच्या परिचयाचे होते. एकंदर त्याचा मृत्यू हा बळ्ळारी भागात चर्चेचा विषय ठरला होता.