वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील भिरोंडा येथील नदीवर सहलीसाठी आलेला 24 वर्षे तरुण बुडाला आहे. सदर घटना रविवारी संध्याकाळी घडली असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. अग्निशामक दलाच्यावतीने शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असून रात्री उशिरापर्यंत शोध जारी होता. शुभम अर्जुन पाटील (24, रा. डिचोली औद्योगिक वसाहत) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की शुभम अर्जुन पाटील व त्याचे अन्य मित्र रविवारी दुपारी भिरोंडा सत्तरी येथील नदीच्या ठिकाणी सहलीसाठी आले होते. दुपारी जेवण झाल्यानंतर संध्याकाळी नदीच्या पात्रात आंघोळ करीत असतानाच अचानकपणे शुभम पाटील पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरल्यानंतर अग्निशामक व पोलीस यंत्रणेला यासंदर्भात माहिती देण्यात आली. दोन्ही खात्याच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन शुभमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाच्या जवानांनी संबंधित क्षेत्रात शुभम याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडू शकला नसल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस व अग्निशामक दलाची यंत्रणा घटनास्थळी बारकाईने शोध घेताना दिसत होती.
यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार शुभम पाटील हा डिचोली येथील एका ज्वेलर्सकडे काम करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सतत हसत चेहरा व आपल्या मायाळू स्वभावाने प्रत्येकाशी वेगळे संबंध जोडणारा हा तरुण डिचोलीत अनेक मित्र जोडण्यासाठी यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया भागातून ऐकायला मिळाल्या.