रांची / वृत्तसंस्था
भीमा कोरेगाव येथे 2018 मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) 83 वषीय सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांना झारखंडमधून अटक केली आहे. गुरुवारी रात्री स्टॅन स्वामी यांना त्यांच्या झारखंडमधील रांची येथे असलेल्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले. निवासस्थानी टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये काहीवेळ चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी एनआयए पथकाने स्टेन स्वामी यांची जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चौकशी केली होती. तसेच त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात बोलावण्यात आले होते. परंतु वयोमानानुसार आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपण प्रवास करू शकत नाही असे स्वामी यांनी स्पष्ट केले हेते.