संकेश्वर येथील डॉ. सचिन मुरगुडे गंभीर : पत्नी डॉ. श्वेता, मुलगी सिया जागीच ठार : बेनकनहोळी येथे कारने ट्रकला ठोकरले
प्रतिनिधी /संकेश्वर
भरधाव कारने बेनकनहोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात संकेश्वर येथील डॉक्टर दाम्पत्यापैकी पत्नीचा तसेच मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. 13 रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. डॉ. श्वेता सचिन मुरगुडे (वय 38) व कु. सिया सचिन मुरगुडे (वय 7) (रा. संकेश्वर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर डॉ. सचिन शिवानंद मुरगुडे (वय 45) यांची प्रकृती गंभीर असून केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सदर दाम्पत्य येथील नामवंत नेत्रतज्ञ होते.
अपघातासंदर्भात समजलेली माहिती अशी की, डॉ. सचिन मुरगुडे हे पत्नी डॉ. श्वेता व मुलगी सिया यांच्यासोबत केए 23 एन 4261 या कारने बेळगावहून संकेश्वरच्या दिशेने भरधाव जात होते. बेनकनहोळीनजीक येताच त्यावेळी त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रकला कारची मागून जोराची धडक बसली. कारमधील तिघांनाही जबर मार बसल्याने डॉ. श्वेता व मुलगी हे दोघे जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. व्ही. न्यामगौडा व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर तिघांनाही बेळगाव येथील केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले होते. दुपारी 4.30 वाजता संकेश्वर शहरात अपघाताचे वृत्त वाऱयासारखे पसरल्याने सर्व डॉक्टर, व्यापारी, नेते मंडळी व मुरगुडे चाहत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरातील दुकाने, व्यवहार, व्यापार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.
सुटीचा आनंद काळाने हिरावून घेतला
रविवार हा सुटीचा दिवस आनंदात घालविण्यासाठी डॉ. मुरगुडे यांनी बेळगावमधील हॉटेलमध्ये जेवणाचा बेत आखला होता. जेवण आटोपून घरी परतत असताना काळाने मुरगुडे कुटुंबावर घाला घातला. सदर अपघाताने मुरगुडे कुटुंबाच्या सुटीचा आनंद हिरावून घेतल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
मुरगुडे यांचा अखेरचा वारदार संपला
येथील जुन्या पुणे-बेंगळूर महामार्गावर मुरगुडे यांचे आय. हॉस्पिटल ऍन्ड लेसर सेंटर आहे. पूर्वी त्यांचे वडील कै. डॉ. शिवानंद मुरगुडे येथे सेवा देत होते. गतवर्षीच डॉ. शिवानंद मुरगुडे यांचे निधन झाले. त्यामुळे हॉस्पिटल डॉ. सचिन चालवत होते. सचिन हे शिवानंद मुरगुडे यांचे एकमेव चिरंजीव होते. सदर अपघातामुळे मुरगुडे घराण्याचा अखेरचा वारस संपल्याची चर्चा शहरात सुरू होती. सचिन यांच्या पश्चात आई आहे.