सात वर्षीय मुलीसह महिला गंभीर, कराडवरून वास्तुशांतीसाठी जाताना अपघात
प्रतिनिधी/ कराड, आष्टा
सांगली येथील नातेवाईकांच्या वास्तुशांती समारंभासाठी आगाशिवनगर-मलकापूर (ता. कराड जि. सातारा) येथून सांगलीकडे निघालेल्या पोळ कुटूंबाच्या कारला आष्टा येथे शनिवारी भीषण अपघात झाला. सांगली-इस्लामपूर रस्त्यावर स्वीफ्ट आणि अल्टो कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले. तर सात वर्षांची चिमुकलीसह अन्य वाहनातील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास गाताडवाडी फाटय़ानजीक हा अपघात घडला. या अपघातात आगाशिवनगर येथील पोळ कुटूंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने मलकापूरसह कराडवर शोककळा पसरली.
या भीषण अपघातात उद्योजक अधिकराव जगन्नाथ पोळ (वय 49), त्यांची आई गिताबाई जगन्नाथ पोळ (70), सुषमा अधिकराव पोळ (42) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सरिता सुभाष पोळ (35), समृद्धी सुभाष पोळ (7, सर्व रा. पोळवस्ती, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताने पोळ कुटूंबासह संपुर्ण परिसर हादरला आहे. दरम्यान, अपघातात दुसऱया कारमधील चालक दत्ता पांडूरंग गडदे (वय 25) राहणार पाच्छापूर ता. जत सध्या रा. सांगली, प्रकाश शेट्टी, साजिद अन्सारी हे सुद्धा या अपघातात जखमी झाले आहेत.
दोन्ही कारचा अक्षरशः चक्काचूर
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर-आगाशिवनगर (ता. कराड) येथील उद्योजक अधिकराव पोळ हे पत्नी, आई, भावजय, पुतणी यांच्यासह सांगली येथील नातेवाईकाच्या घरांच्या वास्तुशांती समारंभासाठी शनिवारी सकाळी निघाले होते. अल्टो कार एम.एच. 50 ए. 2764 मधून ते सांगलीकडे निघाले होते. सकाळी त्यांची कार पेठ नाका ते इस्लामपूरमार्गे सांगलीकडे जात निघाली होती. गाताडवाडी फाटय़ानजीक आल्यावर समोरून येणाऱया स्विफ्ट कार व अल्टो कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पोळ यांच्या कारमधील अधिकराव पोळ, त्यांची आई गिताबाई पोळ आणि पत्नी सुषमा पोळ, सरिता पोळ, समृद्धी पोळ यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. दोन्ही कारची धडक एवढी जोराची होती की दोन्ही कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला होता.
पोळ कुटूंबावर शोककळा
अपघात होताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी जखमींना कारमधून बाहेर काढत खासगी रूग्णालयात हलवले. वैद्यकीय सुत्रांनी अधिकराव जगन्नाथ पोळ, गिताबाई जगन्नाथ पोळ, सुषमा अधिकराव पोळ यांना मृत घोषित केले. तर सरिता सुभाष पोळ आणि समृद्धी पोळ या अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना कराडला उपचारासाठी हलवण्यात आले. पोळ कुटूंबाच्या कारला अपघात झाल्याचे समजताच आगाशिवनगर, मलकापूर, कराड परिसरातील अधिकराव पोळ यांचा मित्रपरिवार घटनास्थळाकडे धावला. अपघातात अधिकराव पोळ यांच्यासह तिघांचा मृत्यू झाल्याचे समजताच पोळ कुटूंबासह मित्रपरिवारावर शोककळा पसरली.
दुसऱया कारमधील तिघे जखमी
दरम्यान, पोळ यांच्या कारची व ज्या स्विफ्ट कारची धडक झाली त्या कारमधील दत्ता पांडुरंग गडदे, प्रकाश शेट्टी आणि साजीद अन्सारी हे तिघे जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी रक्ताचे थारोळे, पाण्याची बाटली, संसारपयोगी साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. हे चित्र ह्रदय हेलावून टाकणारे होते सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आगाशिवनगरमधील अधिकराव पोळ इतर नातेवाईक, कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपचार सुरू असणाऱया रुग्णालयांमध्येही नातेवाईकांसह मित्रपरिवाराने गर्दी केली होती. नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश सुरू केला होता. अधिकराव पोळ हे बांधकाम व्यावसायिक होते. दरम्यान, घटनेची माहिती समजताच आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
पोळ वस्ती हादरली
अधिकराव पोळ यांचा जनसंपर्क मोठा होता. दोन्ही भावंडांसह ते उद्योग व्यवसायात चांगले परिचित होते. अधिकराव पोळ यांच्यासह त्यांची आई, पत्नी यांच्या जाण्याने पोळ कुटूंबासह पोळ वस्तीला हादरा बसला. पोळवस्तीतील त्यांच्या घरासमोर शनिवारी दुपारनंतर मोठी गर्दी जमली होती. मित्रपरिवारालाही हा धक्का सहन न होणारा होता. अधिकराव पोळ यांच्या जाण्याने संघर्षातून पुढे आलेला एक उद्योजक हरपल्याची भावना प्रत्येकाने व्यक्त केली.