वार्ताहर /काकती
भुतरामट्टी, हळ्ळेहोसूर, केंचनट्टी, ईरनभावी आदी परिसरातील शिवारात बटाटा पिकाची वाढ जोरदार असून फुलोरा निवसण्याच्या अवस्थेत आहे.
भुतरामट्टी परिसरातील शिवारात बटाटय़ाचे पीक उत्तम सजले आहे. बटाटा पिकाची लागवड होऊन 60 ते 70 दिवस झाले आहेत. येथील जमीन बटाटा पिकांसाठी चांगली असून सामू 5.5 ते 6.5 च्या दरम्यान असल्याने जमिनीतील बटाटा पिकाला लागणारी प्रमुख अन्नद्रव्ये, स्फुरद, मॅग्नेशियम व कॅल्शियम ही अन्नद्रव्ये मोठय़ा प्रमाणात रोपटय़ांना उपलब्ध होतात. तर 15 दिवसापूर्वी नत्राचा दुसरा हप्ता शेतकऱयांनी पिकाला दिला आहे. परिणामी पीक बहारदार फुलोऱयात येऊन निवसण्याच्या प्रक्रियेत आहे. बटाटय़ाची रोपटी जोमदार वाढली असून मुळात गोळी धरण्याच्या अवस्थेत आहे. बटाटय़ाची दोन वेळा खुरपणी देखील झाली असून जिकडे तिकडे बटाटा पीक बहरले आहे.
येथील प्रमुख पिके कापूस, सोयाबीन असले तरी या पिकांच्या तुलनेत बटाटा पीक या परिसरात 160 एकरात घेण्यात आले आहे. पिकांची अवस्था मध्यावर असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात काढणीला येणार आहेत. येथून पुढे हलक्या सरी आणि ऊन मिळाल्यास बटाटा पिकाला पोषक हवामान होणार आहे. यामुळे बटाटा पीक भरघोस येण्याची शक्यता येथील शेतकरीवर्गातून बोलली जात आहे. बटाटा पीक उत्तम असल्याने शेतकरीवर्ग आनंदी आहे.