काकती पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामहट्टीजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या तिहेरी अपघातात नरसिंगपूर (ता. हुक्केरी) येथील एक तरुण जागीच ठार झाला. तर मोटारसायकलस्वार जखमी झाला. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
श्रीधर दत्तात्रय बेन्नी (वय 22, रा. नरसिंगपूर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोटारसायकल चालविणारा शानूर बसाप्पा हंचिनमनी (वय 28, रा. सुतगट्टी) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण पटवर्धन व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मुक्तीमठ क्रॉसजवळ डिझेल घालण्यासाठी पेट्रोलपंपकडे वळणाऱया एका कॅन्टरला दुसऱया कॅन्टरची धडक बसली. याचवेळी महामार्गावरून जाणाऱया दुचाकीला त्यातील एका कॅन्टरची धडक बसली. दुचाकीला ठोकरून कॅन्टर रस्त्याशेजारच्या झाडावर आदळला. या अपघातात श्रीधर हा तरुण जागीच ठार झाला.
श्रीधर व शानूर खासगी कारखान्यात काम करतात. हायवे क्रॉस करताना हा अपघात घडला. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.