जंगलाच्या राजाला पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता :तिन्ही सिंह सध्या क्वॉरंटाईनमध्ये, पुढील आठवडय़ापासून प्राणी संग्रहालय सर्वांना खुले
प्रतिनिधी / बेळगाव
भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात गुरुवारी पहाटे तीन सिंह दाखल झाले आहेत. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीनुसार दाखल झालेल्या या सिंहांना सध्या क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. मात्र लवकरच पर्यटकांना हे सिंह पाहता येणार आहेत. अशी माहितीही वनविभागाकडून उपलब्ध झाली आहे. शहरापासून जवळ असलेल्या भुतरामहट्टी मिनी झूमध्ये दाखल झालेल्या सिंहांना पाहण्याची पर्यटनप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून लवकरच ती पूर्ण होणार आहे.
बेंगळूर शेजारी असलेल्या बन्नेरघटा बायोलॉजीकल पार्क येथून दोन नर तर एक मादी असणारे नकुल, कृष्ण आणि निरुपमा अशी नावे असणारे तीन सिंह गुरुवारी दाखल झाले आहेत. ही माहिती मिळताच काही वन्यप्रेमींनी भुतरामहट्टीतील प्राणी संग्रहालयात गर्दी केली. मात्र हे सिंह पाहण्यासाठी प्राणी संग्रहालय खुले करण्यात आले नाही. त्यामुळे वन्यप्रेमींना नाराज होऊन माघारी परतावे लागले. मात्र पुढील आठवडय़ापासून हे प्राणी संग्रहालय सर्वांना खुले करण्यात येणार असून बेळगावकरांना लवकरच जंगलाच्या राजांचे (सिंहाचे) दर्शन घेता येणार आहे.
देखभालीसाठी कर्मचाऱयांची नेमणूक
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात या सिंहांची होल्डींग रुममध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या सिंहांची देखभाल करण्यासाठी कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली असून आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टराचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
नियोजनबद्ध खोल्यांची बांधणी
तब्बल 34 एकरात पसरलेल्या या मिनी झूमध्ये वन्यप्राण्यांचे योग्य संवर्धन क्हावे, यासाठी नियोजनबद्ध खोल्यांची बांधणी करण्यात आली आहे. एकमेकांपासून सिंहांना कोणताही धोका पोहचू नये, याकरिता तीन वेगवेगळय़ा खोल्यांमध्ये या सिंहांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. शिवाय लवकरच या प्राणी संग्रहालयात वाघ, चित्ता, अस्वल, गवीरेडे, कोल्हे, हरिण आदी वन्यप्राणी आणले जाणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना वन्यप्राणी जवळून पाहता येणार आहेत.
विविध जातीचे पक्षीही सोडणार
या मिनी झूमध्ये टायगर सफारी आणि टायगर घर निर्मितीचे काम देखील अंतिम टप्प्यात आल्याने पर्यटकांना लवकरच टायगर सफारीचा आनंद लुटता येणार आहे. येथील निसर्गधामाचे मिनी प्राणी संग्रहालयात रुपांतर करून वन्यप्राण्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच निवारा शेडची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये विविध जातीचे पक्षीही सोडण्यात येणार आहेत.